Falna fire accident latest news : राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील फालना शहरात दिवाळीत फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या आगीत स्थानिक काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आगीपासून वाचण्यासाठी ते दुकानाच्या अंडरग्राउंड बेसमेंटमध्ये गेले होते. मात्र तिथेच गुदमरल्याने आणि आगीच्या चपेट्यात आल्याने पती-पत्नीचा जिवंत जळून अंत झाला. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेचा भयंकर व्हिडीओही समोर आला आहे.
सोमवारी रात्री ११ वाजता फालनामधील मुख्य चौकाजवळील फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीने जवळच्या किराणा आणि बॅटरीच्या दुकानांमध्ये पसरली. या दुर्दैवी घटनेत काँग्रेसच्या नगरसेविका उषा पूनमिया आणि त्यांचे पती प्रकाश यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी एक व्यक्ती गंभीररित्या भाजली आहे.
आगीत काँग्रेस नगरसेविका आणि पतीचा मृत्यू
मृतांची ओळख खुडाला-फलना नगरपालिकेच्या वॉर्ड २३ च्या नगरसेविका उषा पूनमिया आणि त्यांचे पती प्रकाश अशी पटली आहे. बचावकार्यादरम्यान दुकानाच्या तळघरातून उषा पूनमिया यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आगीत त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिकांच्या मते, फटाक्यांनी भरलेल्या दुकानात एका ठिणगीमुळे आग लागली. त्यानंतर आग झपाट्याने पसरली आणि जवळच्या किराणा व बॅटरीच्या दुकानं जळून खाक झाली. आग पसरताच परिसरात भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण तोपर्यंत २ जणांचा मृत्यू झाला.
पाच अग्निशमन गाड्यांनी सहा तासांत आगीवर नियंत्रण
फालना, खुडाला, बाली आणि सुमेरपूर येथून अग्निशमन गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. आग विझवण्याचे काम ५ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पार पाडण्यात आले. सहा तास चाललेल्या बचाव आणि मदतकार्यानंतर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवता आले. यादरम्यान दुकानांमध्ये कोणी अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन शोधमोहीमही राबवण्यात आली.
या अपघातात गौतम चंद पूनमिया गंभीररित्या भाजले आहेत. त्यांना चांगल्या उपचारांसाठी जोधपूरला दाखल करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह फलना शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आगीदरम्यान पुढील धोका टाळण्यासाठी प्रशासनाने परिसरातील वीजपुरवठाही खंडित केला आहे.
आगीमुळे जवळच्या अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तथापि, नुकसानीचा अधिकृत अंदाज अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. माहिती मिळताच फालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.