दिल्लीत सत्य निकेतन परिसरात हॉस्टेलची इमारत कोसळून मोठी दुर्घटना
दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, तर १० जणांची सुखरूप सुटका
बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश दिले
दिल्लीत एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे एक जुनी बिल्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. सदर घटना सत्य निकेतन परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ५० जण अडकल्याची माहिती आहे. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला असून १० जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरू असून, मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नानकपुरा गुरुद्वाराजवळील हॉस्टेल डेझ नावाची बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग दुपारी दीड वाजता कोसळली. या बिल्डिंगमध्ये विद्यार्थ्यांचे हॉस्टेल होते. दुर्घटनेच्या वेळी बिल्डिंगच्या तळमजल्यावर बांधकामाचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे. या कामामुळे बिल्डिंगला धोका निर्माण झाला आणि त्यातूनच बिल्डिंग कोसळल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही अनेक जण अडकल्याची भीती आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी बिल्डिंग मालक हरिराम आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दक्षिण कॅम्पस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १०५, २९० आणि १२५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुर्घटनेची गंभीर दखल घेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक पाहणीनंतर त्यांनी या प्रकरणाची मजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बिल्डिंग मालकाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दुर्घटनेसाठी जो कोणी जबाबदार आढळेल, त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यानंतर एम्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर आणि वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. सर्व जखमींना तातडीने, मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. दरम्यान, बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.