
वंदे भारत स्लीपर ट्रेन सप्टेंबर २०२५ मध्ये धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केली मोठी घोषणा.
ट्रेन १८० किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावणार
आरामदायी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही ट्रेन डिझाइन करण्यात आलीये.
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारतनंतर आता रेल्वे रूळावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावताना दिसणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच वंदे भारत स्लीपर ट्रेन कधीपासून धावणार याची माहिती दिली. अश्विनी वैष्णव यांनी गुजरातच्या भावनगरमधील एका कार्यक्रमामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेन पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे सांगितले.
भारतीय रेल्वे लवकरच त्यांच्या सेमी हाय-स्पीड ट्रेनच्या नेटवर्कमध्ये एक नवीन नाव जोडणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची प्रचंड लोकप्रियता पाहून रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून ती लवकरच रूळावरून धावणार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गांवर सुसाट आणि आरामदायी प्रवास व्हावा यासाठी डिझाइन केली गेली आहे. या ट्रेनची चाचणी देखील पूर्ण झाली आहे आणि आता अंतिम तांत्रिक चाचण्या आणि कमिशनिंग प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन रूळावर धावणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडद्वारे (BEML) इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्याने तयार केली जात आहे. ही ट्रेन १६ डब्यांची असणार आहे. हे डबे ३ श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. या ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी २-टायर आणि एसी ३-टायर असतील. या ट्रेनमधून एकाच वेळी ११२८ प्रवासी प्रवास करू शकतील. या ट्रेनचा प्रत्येक कोच अशापद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे की यातून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आराम मिळेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अशा काही सुविधा देण्यात आल्या आहेत त्यामुळे ती इतर ट्रेनपेक्षा खूपच वेगळी आहे. ही ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वैशिष्ट्ये म्हणजे या ट्रेनमध्ये रिअल-टाइम प्रवासी माहिती प्रणाली, यूएसबी-इंटिग्रेटेड रीडिंग लॅम्प, सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही, मॉड्यूलर पेंट्री युनिट्स, एसी फर्स्ट क्लासमध्ये अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, दिव्यांग प्रवाशांसाठी सुलभ बर्थ आणि टॉयलेट, स्पर्शरहित बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, प्रशिक्षकांमधील संवादासाठी टॉक-बॅक युनिट्स आणि सेन्सर आधारित इंटरकनेक्टिंग दरवाजे या सुविधा मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या ट्रेनमधील प्रत्येक सीटवर मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्याची सुविधा असणार आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार हे रेल्वेकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. रेल्वे बोर्ड लवकरच यावर निर्णय घेईल. अशी देखील माहिती समोर आली आहे ही ट्रेन अशा मार्गावर धावणार आहे जिथे लांब पल्ल्याचा प्रवास आहे. दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा किंवा मुंबई-अहमदाबाद यापैकी एका मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.