भाजपचे राज्यसभा खासदार आणि उत्तरप्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांची राज्यसभा जागा रिक्त करण्यात आली आहे. दिनेश शर्मा यांची नुकतीच अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश शर्मा यांनी सभापती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यसभेच्या सदस्याचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यसभा सचिवालयाकडून याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली.
राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभा सदस्य डॉ. दिनेश शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, सभापतींनी तो स्वीकारला आहे. राजीनामा देण्यापूर्वी दिनेश शर्मा यांनी वित्तविषयक संसदीय स्थायी समितीच्या अंतिम बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत समितीचे अध्यक्ष भर्तुहरी महताब यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 5 सप्टेंबर रोजी डॉ. दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली होती. ते सेवानिवृत्त अॅडमिरल डी. के. जोशी यांची जागा घेणार आहेत. डी. के. जोशी यांनी 8 ऑक्टोबर 2017 रोजी अंदमान-निकोबारच्या उपराज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. दिनेश शर्मा यांचे वय 62 वर्षे असून, त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपणार होता. मात्र, उपराज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.