Manipur Imphal West grenade blast latest news : मणिपूरमध्ये भाजपचे आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्री अचानक ग्रेनेड (बॉम्ब) स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी स्वतः आमदारांच्या घरी भेट देऊन पाहणी केली आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मणिपूरमधील कोंथौजम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. सपम रंजन सिंह यांच्या इम्फाल वेस्ट येथील निवासस्थानी गुरुवारी (२८ ऑगस्ट) मध्यरात्री सुमारे १:३० वाजताच्या सुमारास जोरदार ग्रेनेड स्फोट झाला. हा स्फोट आमदाराच्या घराच्या मागच्या बाजूला झाला. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आसपासच्या परिसरातील लोक घाबरून घराबाहेर आले.
आमदार डॉ. सपम रंजन सिंह हे घटनेच्या आदल्या दिवशीच दिल्लीहून परतले होते. मणिपूरमधील परिस्थितीबाबत त्यांनी दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीहून परतताच काही तासांतच त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कोणाशीही वैयक्तिक शत्रूता नव्हती आणि त्यांना आधी कोणतीही धमकीही मिळाली नव्हती.
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळाला भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी दुपारी आमदार सपम रंजन सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांनी तपासाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत याला "लोकशाहीवरील हल्ला" म्हटले आहे आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन दिले.
स्थानिक महिलांचे मुख्य दारावर धरणे आंदोलन
या हल्ल्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. घटनेनंतर कोंथौजम परिसरातील स्थानिक महिलांनी आमदारांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून शांततापूर्ण धरणे आंदोलन केले. अशा हिंसक घटनांवर प्रशासनाने त्वरित आणि कठोर आळा घालावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे. सध्या पोलीस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून, या स्फोटामागे नक्की कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.