

BJP Candidate List : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या '२ मंत्र्यांचा पत्ता कट' झाल्याचे दिसतेय. त्यामुळेच मोदी मंत्रिमंडळाचे गणित बदलणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या मंत्र्यांना डच्चू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एकमेव ख्रिश्चन चेहरा असलेले जॉर्ज कुरियन हे मध्य प्रदेशातून, तर रवनीत सिंग बिट्टू हे राजस्थानमधून विद्यमान राज्यसभा खासदार आहेत. २१ जून रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतरही पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. परिणामी, मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.
याआधी मंत्रिमंडळातील इतर दोन राज्यमंत्री – पंकज चौधरी (उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष) आणि हर्ष मल्होत्रा (दिल्ली भाजप अध्यक्ष) यांना आधीच संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात आता या दोन मंत्र्यांची नावे कट झाल्याने बदलांच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी, जुन्यांना निरोप
भाजपने या निवडणुकीत कोणत्याही निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदाराला दुसरी संधी दिलेली नाही. पक्षाने संघटनात्मक नेत्यांना प्राधान्य दिले असून, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ (मध्य प्रदेश) आणि राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (राजस्थान) पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवणार आहेत. तसेच बीजेडी सोडून भाजपमध्ये आलेल्या देबाशीष सामंतराय यांना ओडिशा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.
गुजरातमध्ये पक्षाने राजुभाई शुक्ला, मुकेशभाई रथवा, मानसिंग परमार आणि जितेंद्र कांजरिया या चार नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ईशान्य भारतातून मणिपूरच्या प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी आणि अरुणाचल प्रदेशमधून माजी प्रदेशाध्यक्ष ताई तागाक यांची निवड करण्यात आली आहे.
मंत्रिपदाचे काय होणार?
झारखंड आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे, परंतु पक्षाने अद्याप तेथील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांपैकी कोणा एकाचे नशीब उघडणार का, याकडे लक्ष लागले आहे. नियमानुसार, २१ जून रोजी खासदारकी संपल्यानंतरही हे दोन्ही मंत्री पुढील ६ महिन्यांपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. मात्र, पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिट्टू यांच्यावर संघटनेची नवी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता अधिक आहे.
नितीन नबीन यांनी भाजप अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून पक्षात संघटनात्मक बदलांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या या नव्या समीकरणांनंतर पुढील काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.