बिहारच्या अररिया जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भीषण कार अपघात झाला.
लग्न ठरवण्याचा कार्यक्रम आटोपून सात जण कारमधून घरी परतत होते.
पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून मरिया नदीत कोसळली.
या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बिहारमधील अररिया जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न ठरवण्याच्या समारंभातून घरी परतणाऱ्या ६ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. प्रवासादरम्यान कार थेट नदीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. या अपघातामुळे मृतांच्या गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. सुपौल जिल्ह्यातील पिपरा परिसरातून काही जण सिकटी येथील भपटिया गावात लग्न ठरवण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण कारमधून आपल्या घरी परतत होते. याचवेळी ताराबाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडी पुलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पुलाचा कठडा तोडून थेट मरिया नदीत कोसळली.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडी नदीत पडल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. कारला दोरीने बांधण्यात आली आणि जेसीबीच्या मदतीने ती नदीबाहेर काढण्यात आली. मात्र, या दुर्घटनेत सहा जणांचा जीव वाचू शकला नाही.
या अपघातात कुंदन यादव (२८), आर्यन (१५), मुन्ना कुमार (२२), आदित्य (२०), सौरभ (१५) आणि यश कुमार (१६) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण सुपौल जिल्ह्यातील थुमहा गावचे रहिवासी होते. अपघातात एका व्यक्तीला वाचवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.