Delhi Earthquake News: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय उत्तर भारतातील काही राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामध्ये हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि चंदीगडसह अनेक राज्यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडपासून ३० किमी आग्नेयला ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला, अशी माहिती एएनआयने ट्विट करून दिली आहे. दरम्यान, फक्त भारतातच नाही तर पाकिस्तान आणि चीनमध्येही या भूकंपाचे धक्के बसले आहेत.
दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी हे धक्के जाणवले आहेत. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता.
त्याची खोली जमिनीच्या आत 6 किलोमीटर होती. हे धक्के बराच वेळ जाणवत होते. मात्र, आतापर्यंत भारत किंवा पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली आहे.
दरम्यान, भूकंपाचे हादरे बसल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi) लोकांची धावपळ सुरु झाली होती. घर, ऑफिसमध्ये असणारे अनेकजण जीव वाचवण्यासाठी मोकळ्या परिसरात पोहोचले होते. ट्विटरवरून काहींनी घरातील पंखे हालतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तर काहींनी कार्यालयात काय स्थिती होती हे दाखवलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.