आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये धक्कादायक घटना घडली आली आहे. होमवर्क पूर्ण न केल्यामुळे शिक्षिकेने सहा वर्षांच्या चिमुकल्याला चापट मारल्याचा आरोप आहे. चापट मारल्यानंतर काही सेकंदांतच हा चिमुकला वर्गात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशाखापट्टणमच्या वन टाऊन परिसरातील एका खासगी शाळेत ही घटना घडली. CCTV फुटेजमध्ये एक मुलगा शिक्षिकेसमोर उभा असल्याचं दिसत आहे. तो घाबरलेला असून शिक्षकाला मारू नका अशी विनंती करताना दिसतो. त्यानंतर शिक्षिकेने त्याला जवळ ओढून गालावर चापट मारल्याचं CCTV मध्ये दिसतं. चापट मारल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत मुलगा शिक्षकाच्या अंगावर कोसळतो.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने इतर शिक्षकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलाला CPR देण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घाबरल्यामुळे मुलाला कार्डियाक अरेस्ट आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी किंग जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेबाहेर गर्दी केली. मुलाच्या वडिलांनी शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कुटुंबीय देवदर्शनासाठी गेले होते आणि बुधवारीच ते परतले होते. त्यामुळे मुलाचं होमवर्क पूर्ण झालं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. माझ्या मुलाला कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती. विद्यार्थ्यासोबत शिक्षक इतका वाईट व्यवहार कसा करू शकते? असा संतप्त सवाल मुलाच्या वडिलांनी केला.
मुलाच्या आईनेही शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. घटनेची माहिती कुटुंबीयांना न देता शाळेतील कर्मचारी मुलाला थेट रुग्णालयात घेऊन गेले, असा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर शिक्षकाच्या मारहाणीमुळेच मुलाचा मृत्यू झाला का, याचा तपास आता करण्यात येणार असून पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.