पाटना: NEET पेपरफुटी प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 22 आणि 25 जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर ताब्यात घेतलेल्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना 24 तासांहून अधिक काळ पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. दरम्यान 25 जुलैच्या बंददरम्यान झालेल्या हिंसाचारात AK-47 मधून गोळीबार करणाऱ्या सिवानमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
अॅडव्होकेट आकांक्षा शाही, ज्या अटक केलेल्या विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करत आहेत. त्यांनी सांगितले की, 25 जुलै रोजी 58 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आणखी 87 जणांना रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेकजण हे अल्पवयीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वकिलांच्या मते, सुमारे 15 जणांना दीघा, तर 22 जणांना रुपसपूर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. अॅडव्होकेट अभिषेक कुमार यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अटकेबाबत माहिती देण्यात आलेली नव्हती. कायद्यानुसार अटक केलेल्यांना 24 तासात न्यायालयात हजर करणे बंधनकारक असते. मात्र हा कालावधी रविवारी दुपारी 2 वाजता संपला होता. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. दिशा स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या सदस्य आणि विद्यार्थी नेत्या सोमा कुमारी यांनी सांगितले की, 25 जुलैच्या आंदोलनादरम्यान 200 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी सुमारे 70 टक्के अल्पवयीन आहेत. तसेच पुढच्या कुठल्याही कार्यवाहीची माहिती पोलीस देत नाहीत.
गांधी मैदान पोलीस ठाण्याचे अधिकारी अखिलेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, २५ जुलैच्या हिंसाचारात चार FIR दाखल करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान सरकारी वाहनांची तोडफोड, पोलिसांवर हल्ला आणि कर्तव्य बजावण्यास अडथळा निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या हिंसाचारात १९ सरकारी आणि एका खासगी वाहनाची तोडफोड झाली, तर ५८ पोलीस कर्मचारी जखमी झाले. सिवानमधील AK-47 मधून गोळीबार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.