मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात विद्यार्थी आक्रमक; बिहारमध्ये ट्रेन पेटवली

केंद्र सरकारने लष्करी सेवेसाठी लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे.
Agnipath Scheme
Agnipath SchemeSaam TV

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लष्करी सेवेसाठी लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. हजारो तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत आहेत. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. हरियाणातही अग्निपथ विरोधात आंदोलन करण्यात आलं. आंदोलक विद्यार्थी-तरुणांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले. दरम्यान, बिहारमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून बऱ्याच ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. (Agneepath Yojana Protest In Bihar Latest Marathi News)

Agnipath Scheme
सैन्यदलात ४ वर्षे काम करण्याची तरुणांना संधी, काय आहे अग्निपथ योजना?

अग्निपथ योजनेविरोधात बिहारचे तरुण रस्त्यावर उतरले आहे. बक्सरपासून मुंगेरपर्यंत आणि सहरसा ते नवादापर्यंत हिंसक निदर्शने केली जात आहेत. विशेषत: भारतीय रेल्वे संतप्त आंदोलकांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या आंदोलनाचा रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सुरुवातीला आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांनी रुळांवर उतरून अग्निपथ योजनेला विरोध सुरू केला होता. काही वेळातच आंदोलकांनी हिंसक वळण घेतले आणि पॅसेंजर ट्रेनचे डबे पेटवले. त्यामुळे घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त तरुणांनी सिवान जंक्शनजवळ सिसवान धाला रेल्वे ट्रॅक अडवला. त्याचवेळी गोपालगंजमधील सिधवालिया स्थानकावर पॅसेंजर ट्रेन थांबवण्यात आली. जाळपोळ करून हिंसक निदर्शने करण्यात आली.

बिहारमध्ये संतप्त झालेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी सहरसा रेल्वे स्थानकाजवळ सहरसा-मानसी रेल्वे मार्ग पूर्णपणे विस्कळीत केला. त्यामुळे सहरसा येथून निघणाऱ्या सहरसा-नवी दिल्ली वैशाली सुपरफास्ट एक्स्प्रेस, सहरसा-पाटणा राज्यराणी यासह अन्य प्रवासी गाड्या स्टेशनवरच उभ्या आहेत. याव्यतिरिक्त इतरही गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

Agnipath Scheme
देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत आढळले 12 हजारांहून अधिक रुग्ण, 11 मृत्यू

आरा-छपरा येथे ट्रेनला आग

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी मुख्यत: भारतीय रेल्वेला लक्ष केले होते. रेल्वेच्या तोडफोडीसोबतच पॅसेंजर ट्रेनलाही आग लावण्यात आली. फलाटावरील सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. रेल्वे रुळावर झालेल्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्याचवेळी दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर पडणाऱ्या आरामध्ये भीषण निदर्शने होत आहेत.

का होतोय अग्निपथ योजनेला विरोध?

योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये भारतीय लष्कराचे चाहते असा बॅनर घेतला होता. केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निपथ योजना चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला. केंद्र सरकार फक्त चार वर्षांसाठी सैन्यात दाखल करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यात काय करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फक्त 25 टक्के युवकांना सेवेत घेतलं जाणार असल्याने चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com