स्वातंत्र्य दिनाच्या मध्यरात्री ठाण्यातील तलावपाळी जवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली...या ठिकाणी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ व्यांदा लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवला. ध्वजारोहणापूर्वी प्रथमच 'वंदे मातरम्'ची धून वाजवण्यात आली. आपल्या ऐतिहासिक संबोधनात पंतप्रधानांनी २०४७ पर्यंत भारताला 'विकसित राष्ट्र' बनवण्याचा महासंकल्प मांडला. देशातील १ कोटी तरुणांना AI चे मोफत प्रशिक्षण, सागरी तेल शोधासाठी ₹८५,००० कोटींची 'समुद्र मंथन' योजना, आणि शेतीसाठी युरिया व DAP वर भरीव अनुदान सुरू ठेवण्याची मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, जागतिक बाजारात टिकण्यासाठी भारताचा एकच मंत्र 'क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी' असला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
देशात तयार होणाऱ्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, "आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी (Quality) कोणत्याही प्रकारची तडजोड होता कामा नये. 'क्वालिटी, क्वालिटी आणि क्वालिटी' (दर्जा) हाच आता भारताचा मुख्य मंत्र असला पाहिजे."
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, देशातील युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी पूर्ण क्षमतेने केला जात आहे. ज्या क्षेत्रांना पूर्वी 'नो-गो एरिया' (जिथे जाणे किंवा प्रगती करणे कठीण मानले जायचे) म्हटले जायचे, ती क्षेत्रे आता 'गो-अहेड एरिया' (प्रगतीची नवी क्षेत्रे) बनत आहेत.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात संकुचित मानसिकतेचा कसा अडथळा ठरतो, यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, कोणताही देश संसाधनांच्या अभावामुळे क्वचितच मागे पडतो; तर तो बहुतांश वेळा संकुचित मानसिकतेच्या मर्यादांमुळे थांबतो. जेव्हा विचार ठप्प होतात आणि सीमांमध्ये अडकतात, तेव्हा आपण स्वतःची खरी क्षमता ओळखू शकत नाही.
क्रूड ऑइलवरील (कच्च्या तेलावरील) अवलंबित्वाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, जुन्या संकुचित मानसिकतेमुळे देशाच्या ९९% सागरी किनारपट्टीला (Coastline) 'नो-गो एरिया' (No-Go Zone) घोषित करण्यात आले होते. आपण समुद्राच्या खोलवर संशोधन न करण्याचा निर्णय घेतला होता. ती विचारांची गरिबी होती. आम्ही ही परिस्थिती बदलली असून, आता ९९% सागरी क्षेत्र 'गो-अहेड झोन' (Go-Ahead Zone) म्हणून खुले केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत आता समुद्राच्या अथांग आकाशात आणि खोल पाण्यात नवीन तेल व वायू साठ्यांचा शोध घेत आहे. या प्रयत्नांना वेग देण्यासाठी नुकतीच ₹८५,००० कोटींच्या (सुमारे ₹८४,०८४ कोटी) 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राजकीय स्थैर्य, मजबूत लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताकडे आज स्थिर राजकीय कौल (Stable Political Mandate), स्थिर सरकार, जिवंत लोकशाही, मजबूत न्यायव्यवस्था आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे संविधान आहे.
भारताने अलीकडेच केलेल्या विविध आंतरराष्ट्रीय व्यापार करारांचा (Trade Agreements) उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, हे करार देशासाठी मोठ्या संधी घेऊन आले आहेत. मी आपल्या MSME क्षेत्राला सांगू इच्छितो की, आपण ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये.
पंतप्रधान मोदी म्हणाले, १२ वर्षांपूर्वी देशातील केवळ ७० शहरांमध्येच पाइपद्वारे गॅस पोहोचला होता. गेल्या १२ वर्षांत ही संख्या वाढून ७०० शहरांपर्यंत पोहोचली आहे. आज देशातील १.७५ कोटींहून अधिक घरे थेट पाइप गॅस लाईनने जोडली गेली आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या १२ वर्षांत देशातील असंख्य नागरिकांनी—मग ते दलित असोत, पीडित असोत, शोषित असोत किंवा आदिवासी असोत; ग्रामीण भागात राहणारे असोत वा शहरी; गरीब असोत की मध्यमवर्गीय; तरुण असोत किंवा वृद्ध; महिला असोत वा पुरुष; उत्तर, दक्षिण, पूर्व किंवा पश्चिमेकडील असोत—प्रत्येकाने अढळ संकल्प आणि निष्ठेने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. मी देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या या सर्व प्रयत्नांना आणि परिश्रमांना आदरपूर्वक नमन करतो."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत'चा संकल्प पुन्हा एकदा ठामपणे मांडला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आपणही एक भव्य स्वप्न पाहिले आहे—एक असे स्वप्न जे दृढ संकल्प आणि नवीन उंच्चाई गाठण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, म्हणजेच २०४७ पर्यंत आपण भारताला एक 'विकसित राष्ट्र' बनवू. आपल्या १४० कोटी देशवासीयांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि परिश्रमांतून आपल्याला हे ध्येय साध्य करायचे आहे."
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, "जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा ते जागतिक समुदायाच्या डोळ्यात आपल्या शौर्याचे आणि क्षमतेचे प्रमाण ठरते; आणि संपूर्ण जगाला आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावाच लागतो."
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आता लहान स्वप्ने पाहून भागणार नाही. आपल्याला मोठी स्वप्ने पाहावीच लागतील; कारण मोठी स्वप्ने आपली विचारसरणी समृद्ध करतात आणि आपल्या विचारांची क्षितिजे रुंदावतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोणतेही राष्ट्र तेव्हाच महान बनते आणि आपली ध्येये साध्य करते, जेव्हा ते आपल्या स्वप्नांच्या, दृढ संकल्पांच्या आणि अंतर्गत सामर्थ्याच्या जोरावर पुढे जाते. आता लहान स्वप्ने पाहून भागणार नाही, आपल्याला मोठी स्वप्ने पाहावीच लागतील; कारण मोठी स्वप्ने आपली विचारसरणी समृद्ध करतात आणि आपल्या दृष्टिकोनाची क्षितिजे विस्तारतात. आपला संकल्प अढळ असायला हवा. जेव्हा आपला संकल्प पक्का असतो, तेव्हा संकटे आणि आपत्तींच्या काळातही स्वतःचा मार्ग शोधण्याचे सामर्थ्य आपोआप निर्माण होते."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाची आकडेवारी मांडली.संरक्षण क्षेत्रातील उत्पादन गेल्या १२ वर्षांत ४ पटीने वाढले आहे. खादी व ग्रामोद्योगातील उत्पादन ५ पटीने वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन तब्बल ७ पटीने वाढले आहे. मोबाईल निर्मितीमध्ये ३३% ची मोठी वाढ झाली आहे. देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये १००% ची विक्रमी वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आज मोठी स्वप्ने पाहत असून नव्या उंच्चाई गाठण्यासाठी सज्ज आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी भर दिला की, जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश 'विकसित राष्ट्र' बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा संपूर्ण जगाला भारताकडे एका वेगळ्या आणि आदराच्या दृष्टिकोनातून पाहावेच लागेल.
गेल्या १२ वर्षांत देश सातत्याने विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील नागरिकांची मेहनत आणि प्रयत्नांमुळेच भारताने गेल्या १२ वर्षांत कमकुवत अर्थव्यवस्थांच्या ('Fragile Five') यादीतून बाहेर पडून जगातील एक मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०२४७' च्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारताचे २०४७ पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याचे खूप मोठे स्वप्न आहे. जेव्हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा तो आपल्या धैर्याचा आणि सामर्थ्याचा परिचय ठरतो. यामुळे संपूर्ण जगाला आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे भाग पडत आहे."
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील एका अभूतपूर्व प्रसंगाचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी हा एक अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून 'वंदे मातरम्'ची गुंज निनादली आहे."
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पूरपरिस्थितीवर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत उद्भवलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे अनेक नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. मी पूरग्रस्त कुटुंबांना विश्वास देतो की, या कठीण काळात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज आपण सगळे मिळून ८०वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक हृदयात 'वंदे मातरम्'ची गुंज निनादत आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे. देश नव्या संकल्पांना उराशी बाळगून पूर्ण उत्साहाने आणि नवचैतन्याने पुढे जात आहे."
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वंदे मातरम्'च्या गायनाला ऐतिहासिक क्षण म्हटले. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असा प्रसंग आला आहे, जेव्हा लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून 'वंदे मातरम्'ची गुंज संपूर्ण देशात निनादली आहे."
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, या स्वातंत्र्यदिनी मी राष्ट्रपिता बापू, देशासाठी बलिदान देणारे सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांना अत्यंत आदराने आणि नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशवासीयांना संबोधित करत आहेत. भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज प्रत्येक भारतीयाचे हृदय 'वंदे मातरम्'च्या लयीत आणि उत्साहात धडधडत आहे." देशवासीयांच्या देशभक्तीचा गौरव करत त्यांनी नमूद केले, "आज देशातील प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे ('आज हर घर तिरंगा है, हर मन तिरंगा है')."
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला. ध्वजारोहणाचा हा क्षण १७२१ फिल्ड बॅटरीच्या (सेरेमोनियल) सैनिकांकडून देण्यात आलेल्या २१ तोफांच्या सलामीशी अचूकपणे जुळवण्यात (Synchronised) आला होता. या औपचारिक सलामीसाठी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या १०५ मिमी लाईट फिल्ड गन्स (105mm Light Field Guns) चा वापर करण्यात आला. या सेरेमोनियल बॅटरीचे नेतृत्व मेजर पवन सिंग शेखावत यांनी केले. गन पोझिशन ऑफिसर म्हणून नायब सुभेदार अनुतोष सरकार यांनी जबाबदारी सांभाळली.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला. ध्वजारोहणाच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी कॅप्टन सोनिया सिंग चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांना ध्वजारोहणात सहाय्य केले.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात 'वंदे मातरम्'ने हजारो देशभक्तांना प्रेरणा दिली होती. याच ऐतिहासिक महत्त्वाला उजाळा देण्यासाठी यंदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याच्या वेळी संपूर्ण 'वंदे मातरम्' सामूहिकपणे गायले गेले.
या ८०व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 'युवा शक्ती' आणि त्यांच्या सहभागावर विशेष भर देण्यात आला आहे. देशातील तरुणांच्या योगदानाला 'विकसित भारत २०४७' च्या मुख्य उद्दिष्टाशी थेट जोडण्यात आले आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी समाजघटकातील विविध क्षेत्रांतून निवडून आणलेल्या सुमारे ५,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या पाहुण्यांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची आणि लाल किल्ल्यावरून होणारा मुख्य कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहौरी गेट येथे पोहोचले. तेथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिवांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी तिन्ही सैन्यदले आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त 'गार्ड ऑफ ऑनर'ची पाहणी केली.
ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून देशवासीयांना संबोधित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्व प्रथम देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले आणि "विकसित भारत @२०४७" च्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
दिल्ली पोलीस आणि सुरक्षायंत्रणांनी बहुस्तरीय (Multi-layer) सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ५,००० हून अधिक पोलीस कर्मचारी लाल किल्ला परिसरात तैनात आहेत. सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि 'फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञानाने' सज्ज असलेले CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जे गर्दीतून संशयितांची त्वरित ओळख पटवू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत विकसित भारताचा संकल्प साकारण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी लगातार १३व्यांदा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करून एक नवा इतिहास रचत आहेत.
या वर्षीच्या सोहळ्याची मुख्य संकल्पना (Theme) "विकसित भारत@2047 साठी युवा शक्ती" ही आहे. यामध्ये Gen-Z आणि तरुणांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांच्या बैठकीच्या जागांना (Seating Blocks) देशातील प्रमुख तलावांची नावे (उदा. डल, चिल्का, वूलर, लोकटक) देण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्यात पहिल्यांदाच 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत सामूहिकपणे गायले जाणार आहे. हे वर्ष राष्ट्रगीत 'वंदे मातरम्'च्या १५० वर्षांच्या गौरवशाली वारशाला समर्पित केले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.