सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Ganeshotsav DJ and laser show ban demand : पुण्यातील विद्यानंद सुहास बापट यांनी गणेशोत्सवात ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषण रोखण्यासाठी थेट प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. रस्त्यांवरील मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळावी, अशीही मागणी त्यांनी नोटीसद्वारे केली आहे. बापट यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे आणि त्यांच्या टीमने ही नोटीस पाठवली आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) प्रादेशिक अधिकारी यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत असीम सोरोदे यांनी दिली.
नोटीसीतील प्रमुख मागण्या काय आहेत?
गणेशोत्सवादरम्यान उघड्या सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या ॲम्प्लीफायर यंत्रणा, डीजे (DJ) आणि डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेझर शोच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी.
मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी. ढोल-ताशा पथकांवर मर्यादा आणावी, तसेच रुग्णालये, न्यायालये आणि शाळांच्या १०० मीटर परिसरात 'सायलेन्स झोन'चे पालन बंधनकारक करावे.
मनपाने रस्त्यांवर उभारलेल्या गणपती मंडपांची पाहणी करावी. पादचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारे मंडप तत्काळ हलवून अतिक्रमांवर कायदेशीर कारवाई करावी.
CO₂ कॉन्फेटी कॅनन्स, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर बंदी घालावी; तसेच ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी ठिकठिकाणी 'रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले बोर्ड' लावावेत.
प्रशासनाने या नोटीसची तात्काळ दखल घेऊन पुढील ३ दिवसांत केलेल्या उपायांची माहिती न दिल्यास, मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अवमान याचिका (Contempt of Court) दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.