मंगेश कचरे, साम टीव्ही
पुणे: दौंड तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत्या. उषादेवींच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून शोक व्यक्त केला अंबई श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील फेसबुक पोस्ट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.
उषादेवी बाळासाहेब जगदाळे यांनी दोन वेळा दौंडचे आमदारपद भूषविले होते. १९७२ साली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत त्यांनी उल्लेखनीय विजय मिळवला. त्यानंतर १९८० मध्ये त्यांचे पती कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे पाटील आमदार झाले, तर १९८५ मध्ये पुन्हा उषादेवी जगदाळे या दौंड तालुक्याच्या आमदार म्हणून निवडून आल्या. राजकारणातील बारकावे आणि जनतेच्या प्रश्नांचा त्यांना सखोल अभ्यास होता. दौंड तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक जनतेने त्यांना ‘आईसाहेब’ अशी आदराची उपाधी दिली होती. त्यांच्या पती बाळासाहेब जगदाळे यांचे १ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले होते.
जगदाळे कुटुंबाला दौंडकरांनी नेहमीच भरभरून पाठिंबा दिला आहे. विरधवल जगदाळे हे त्यांचे सुपुत्र असून इंद्रजित जगदाळे हे दुसरे पुत्र आहेत. इंद्रजित जगदाळे यांनी दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते सध्या नगरसेवक आहेत. तसेच त्यांची कन्या आणि उषादेवी जगदाळे यांची नात दुर्गादेवी जगदाळे या सध्या दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आहेत.
उषादेवी जगदाळे यांच्या निधनाची माहिती विरधवल जगदाळे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली. त्यांच्यावर आज, १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता दौंड शहरातील भीमा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.