नवी मुंबईच्या उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. 'यशश्रीचे अपहरण झाले नव्हते. आरोपी आणि यशश्री एकमेकांना ओळखत होते. त्यांनी भेटण्याचे ठरवले होते.', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केली. अटकेनंतर चौकशी केली असता दाऊद शेखने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'तरुणीच्या संपर्कात असलेल्या सर्वांची आम्ही चौकशी केली. ३-४ संशयित आम्हाला वाटत होते. त्यांची आम्ही चौकशी केली. दाऊद शेखला आम्ही आज अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. तरुणी आणि तरुणामध्ये ओळख आणि मैत्री होती. ३-४ वर्षांपासून तरुणी तरुणाच्या संपर्कात नव्हती. त्यातूनच त्याने असे कृत्य केले.'
पोलिसांनी पुढे सांगितले की, 'याप्रकरणाचा तपास सुरू आहे. हत्येनंतर तरुणीचा चेहरा कुत्र्यांनी खराब केला असल्याचा संशय आहे. घटनेपूर्वी दोघांचा एकमेकांशी संपर्क झाला होता. त्यामुळे हे किडनॅपिंगचे प्रकरण नाही. दोघांनी एका ठिकाणी भेटायचे ठरवले होते. ते भेटले त्याच ठिकाणी ही घटना घडली. घटनेच्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद झाला असावा त्यामुळे हत्या झाली असावी.'
आरोपी आणि मृत तरुणी एकमेकांना ओळख असल्याचे पोलिसांनी सांगितले. 'हे दोघे एकाच ठिकाणी राहत होते. तपासात दिसून आले की दोघे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी भेटायचे ठरवले होते. तेव्हाच त्याने तिची हत्या केली. आरोपी कर्नाटकमध्ये असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. आमच्या दोन टीमने जाऊन त्याला अटक केली. दाऊद शेखला आज सकाळी अटक केली. दाऊदने गुन्हा कबुल केला आहे. आरोपीने चाकूने वार करत तिची हत्या केली.', अशी माहिती पोलिसांनी दिली.
तसंच, 'दाऊद शेख आधी उरणमध्ये राहायला होता. दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. पण त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला होता. त्याठिकाणी तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने एक ते दोन कंपनी बदलल्या होत्या. याप्रकरणाचा आम्ही तपास करत आहे. आरोपीची अजून चौकशी करायची आहे. मुलीच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज येईल.', असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.