मुलुंड-ऐरोली मार्गावर अपघातानंतर ट्रक हेल्परचे अपहरण
अपहरण केलेला हेल्पर पुण्यातील पूजा खेडकरच्या घरात सापडला
नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकून हेल्परची सुटका केली
खेडकर कुटुंबावर नवे संकट; अपहरण प्रकरणातील संबंधाचा तपास सुरू
पूजा खेडकर यांनी बनावट कागद पत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद मिळवलं. मात्र हे प्रकरण उघडकीस पडलं. त्यामुळे त्यांच्यावर यूपीएससीने गुन्हा दाखल करुन तिचं आयएएस पद रद्द केलं होतं. त्यानंतर पूजा यांच्या आईचा हातात बंदूक घेऊन दमदाटी करण्याचा व्हिडिओ समोर आला होता. आधीच अडचणीत असलेल्या खेडकर यांच कुटुंब नव्या वादात सापडलं आहे. मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला, त्यानंतर ट्रकमधील हेल्परचे अपहरण झाले अन धक्कादायक बाब म्हणजे हा हेल्पर पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी आढळला.नवी मुंबई पोलिसांनी या हेल्परची आज खेडकरांच्या घरातून सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक अपघात झाला. सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरची कार एकमेकांना घासली. त्यावेळी ट्रकमध्ये चालक आणि हेल्पर होता तर कारमध्ये दोघे होते. अपघातानंतर त्यांचे एकमेकांशी भांडण झालं. त्यावेळी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमारला या दोघांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि ट्रक आमच्या मागे घे, असं सांगितलं. पण काही अंतर पुढं गेल्यावर कार नजरेआड झाली.
चालक चंदकुमार चव्हाणने मालक विलास ढेंगरेला घडल्या प्रकाराबाबत कळवलं. मालक ढेंगरेंनी नवी मुंबईमधील रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली अन MH 12 RP 5000 ही कार पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी आढळळून आली. नवी मुंबई पोलिसांनी खेडकरांचे घर गाठले, मात्र पूजा यांच्या आईने गेट उघडले नाही.
त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी खेडकरांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका झाली. मात्र तो खेडकरांच्या घरात कसा पोहचला? ज्या गाडीतून चालकाला पुण्यात आणलं गेलं, ती गाडी खेडकर कुटुंबाकडे कशी काय आली? यात खेडकर कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे? याचा तपास नवी मुंबई पोलीस करत आहे.
या तपासातून खेडकर कुटुंबाचा या अपहरण प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हे समोर येणार आहे. आधीचं खेडकर कुटुंबाचे अनेक कारनामे चर्चेत आहेत, अशातच या अपहरण प्रकरणाने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ केलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.