लोढा अमारा टॉवरच्या २२ व्या मजल्यावर भीषण आग लागली.
धुराचा त्रास होऊन ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
३७५ रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश.
२२०३ फ्लॅट आणि लॉबीचे मोठे नुकसान झाले.
ठाण्यातील कोलशेत भागातील लोढा अमारा इमारतीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इमारतीच्या २२ व्या मजल्यावर लागली होती. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी तीन ते चार अग्निशमन गाड्यांनी सलग प्रयत्न सुरू केले आणि सुमारे रात्री ७ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
आगीचा प्रभाव इतका तीव्र होता की संपूर्ण २२ व्या मजल्यावर आणि त्या मजल्यावरील लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः २२०३ क्रमांकाच्या फ्लॅटचे प्रचंड नुकसान झाले. आगीसोबत निर्माण झालेल्या दाट धुरामुळे इमारतीतील शेकडो रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून अंदाजे ३७५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.
या आगीत दोन रहिवाशांना धुराचा गंभीर त्रास झाला. त्यांना तात्काळ हायलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी राजेंद्र तिवारी, जे २५०१ या फ्लॅटमध्ये राहत होते, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र जयश्री ठाकरे (३६ वर्षे), ज्या २८०५ या फ्लॅटमध्ये राहत होत्या, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली असली तरी या घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ठाणे महापालिका व पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही दुर्घटना ठाण्यातील उंच इमारतींमधील आगसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करत आहे. रहिवाशांनी अशा प्रसंगी सुरक्षिततेसाठी योग्य मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आणि इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टमची नियमित तपासणी करण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.