विकास काटे, साम टीव्ही
ठाणे: नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख घनश्याम फर्डे यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई का करु नये असे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.
मासुंदा तलाव येथील दत्त मंदिर घाटावर विसर्जनाच्या दिवशी या सर्वांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्ती असतानाही ते आणि त्यांचे अधिकारी उपस्थित नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या व्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
महापालिकेतर्फे २० ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवानिमित्त मासुंदा तलाव येथील दत्त मंदिर घाट आणि अहिल्यादेवी घाटावर देवीमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील दत्त मंदिर घाटावरील विसर्जन व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी पाचही जणांची १५ ऑक्टोबरच्या कार्यालयीन आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जन घाटावरील संपूर्ण नियोजन, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजनांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
मात्र, विसर्जनाच्या दिवशी ते किंवा त्यांच्या विभागातील अधिकारी घाटावर उपस्थित नसल्याचे ठाणे महापालिकेच्या आदेशात म्हटले आहे. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मासुंदा तलाव येथील विसर्जन व्यवस्थेतील नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.