विकास काटे, ठाणे
ठाण्याच्या मुंब्रा परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. काही गरीब आणि गरजू महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेत नवजात बाळांची विक्री करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणामुळे मुंब्रा परिसरासह ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण ११ आरोपींना अटक केली असून, या रॅकेटचे धागेदोरे अनेक ठिकाणी पसरल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून गरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नवजात बाळांची विक्री केली जात होती. मुंब्रा येथून सुरू असलेल्या या रॅकेटचे जाळे कल्याण, दिवा आणि रत्नागिरीपर्यंत पसरले होते. या टोळीमध्ये अनेक जण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याचा संशय आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका बाळाची तब्बल सात लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारात बाळाच्या आईला दोन लाख रुपये, तर तिच्या मावशीला दीड लाख रुपये देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. उर्वरित रक्कम कोणाला आणि कशा पद्धतीने देण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत.
या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर या टोळीशी संबंधित आरोपींचा शोध घेऊन पोलिसांनी ११ जणांना अटक केली. या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी अशाच प्रकारे किती बाळांची विक्री करण्यात आली आहे, याचा शोध घेतला जात आहे. गरीब महिलांच्या असहायतेचा फायदा घेऊन नवजात बाळांची पैशांसाठी विक्री करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. मुंब्रा पोलिसांच्या या कारवाईमुळे बाळांच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.