संजय गडदे, साम टीव्ही
उत्तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देत ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय शाने आलम खान, भरत चोपडे, विधानसभा समन्वयक अभिषेक चव्हाण आणि उपशाखा प्रमुख आनंद कातुर्डे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. ठाकरे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला.
मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार शिवसेनेत दाखल झाल्याने उत्तर मुंबईतील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे उत्तर मुंबईतील शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना सिद्धेश कदम यांनी सांगितले की, मुंबई उपनगरातील अनेक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते पक्षात दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. काही कार्यकर्त्यांना यापूर्वीच्या पक्षात अपेक्षित राजकीय संधी किंवा मदत मिळत नसल्याचा दावा कदम यांनी केला. युवा पिढीला न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी कदम यांनी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. या प्रकरणाच्या तपासातून वस्तुस्थिती समोर येईल, तसेच सीबीआयमार्फत होणाऱ्या चौकशीत सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला. दिशा सालियन यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या प्रकरणासंदर्भातील नोटीसवर बोलताना, संबंधित व्यक्तीला आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा अधिकार असल्याचे कदम यांनी सांगितले. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मिमिक्रीच्या मुद्द्यावरही कदम यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविषयी अशा प्रकारचे भाष्य करणे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला देशाचे पंतप्रधान होता येणार नाही, असे मत कदम यांनी व्यक्त केले. आगामी काळात राजकीय परिस्थितीत बदल होईल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पक्षप्रवेश सोहळ्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तर मुंबईतील या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.