Liver transplant: ६ किलो वजनाच्या बाळावर लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी; आईने दिला यकृताचा भाग, चिमुकल्याला मिळालं नवं जीवन!

Baby liver transplant: मुंबईत अवघ्या सहा किलो वजनाच्या एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जनुकीय आजाराने त्रस्त असलेल्या बाळाला आईने यकृताचा काही भाग दान केला. दहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर १५ दिवसांत बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
Liver transplant
Liver transplantAI image
Published On: 

अवघ्या सहा किलो वजनाच्या आणि केवळ एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आलंय. जन्मापासून यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या या बाळाला त्याच्या आईने स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला. तब्बल १० तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला नवं आयुष्य मिळालंय. मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

बाळाची ओळख सुरक्षित राहावी यासाठी त्याचं नाव बदलून शिव असं ठेवण्यात आलं आहे. शिवला जन्मापासूनच त्वचेला खाज येणं आणि लघवीचा रंग गडद होणं अशा समस्या होत्या. तो आठ महिन्यांचा झाला, तेव्हा खाज आणखी वाढली. त्याचं वजनही वाढत नव्हतं तर पोट मात्र फुगत चाललं होतं. अवघ्या एक वर्षाच्या शिवचं वजन फक्त सहा किलो होतं.

जनुकीय आजारामुळे यकृतावर परिणाम

शिवच्या तपासणीत रक्तातील बिलीरुबिनचं प्रमाण खूप वाढल्याचं आढळलं. त्याचप्रमाणे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतही गंभीर बिघाड झाला होता. स्कॅनमध्ये यकृतावर व्रण आणि गाठी दिसून आल्या. शिव सहा महिन्यांचा असताना त्याची यकृताची बायोप्सी आणि जनुकीय तपासणी करण्यात आली. या तपासण्यांमधून त्याला 'अलागिल सिंड्रोम' हा जनुकीय आजार असल्याचं समोर आलं. या आजारामुळे यकृतासह शरीरातील इतर अवयवांनाही नुकसान होऊ शकते.

Liver transplant
Vaginal discharge: योनीतून पांढरा स्राव होणं सामान्य की संसर्गाचे लक्षण? महिलांनो ‘हे’ बदल दुर्लक्षित करू नका

शिवला रक्तातील आम्लाचं प्रमाण वाढण्याचा त्रास म्हणजेच रेनल ट्युब्युलर अॅसिडोसिस होता. फुफ्फुसांच्या छोट्या रक्तवाहिन्या काही प्रमाणात आकुंचन पावल्या होत्या. तसंच फुफ्फुसांमध्ये रक्तदाबही किंचित वाढला होता. शरीराला आवश्यक असलेल्या चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांची कमतरता असल्याने त्याची प्रकृती आणि पोषणही खूप कमजोर झाले होते.

आईने दिला यकृताचा काही भाग

शिववर लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचं वजन कमी असल्याने आणि हृदय, किडनी तसंच रक्त गोठण्याशी संबंधित समस्या असल्याने ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येत शस्त्रक्रियेची तयारी केली.

शस्त्रक्रियेपूर्वी शिवला पुरेशा कॅलरी आणि प्रोटीन देण्यात आली. जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यावरही भर देण्यात आला. त्याचं लसीकरण तपासण्यात आलं. सीटी स्कॅन आणि यकृताच्या आकाराची मोजणी करून आईच्या यकृताचा किती भाग बाळासाठी योग्य ठरेल, याचा अभ्यास करण्यात आला. आईच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली. जनुकीय तपासणीत आईमध्ये JAG1 हा जनुकीय बदल आढळला नाही. सखोल तपासणीनंतर तिला यकृत दान करण्यासाठी योग्य ठरवण्यात आले.

१० तास चालली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

शिवच्या शरीराचा आकार लहान असल्याने त्याच्या रक्तवाहिन्या जोडणं हे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. नवीन यकृताला योग्य रक्तपुरवठा होण्यासाठी अत्यंत बारकाईने रक्तवाहिन्या जोडण्यात आल्या. याशिवाय रक्तस्राव, शरीराचं तापमान, रक्तातील आम्लाचं संतुलन आणि यकृतातील रक्तप्रवाह यांवर सतत लक्ष ठेवण्यात आलं. तब्बल दहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत शिवचे खराब झालेलं यकृत काढून त्याच्या जागी आईने दान केलेला यकृताचा भाग बसवण्यात आला. त्यानंतर रक्तवाहिन्या आणि पित्तनलिकाही जोडण्यात आल्या.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. संजय कुमार गोजा, डॉ. अशोक थोरात, डॉ. आदित्य कुलकर्णी, डॉ. नंदिनी दवे, डॉ. सूनू उदानी यांच्यासह बालरोग पोषणतज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Liver transplant
Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

१५ दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा

शस्त्रक्रियेनंतर शिवला सात दिवस प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आलं. त्यानंतर आठ दिवस हाय-डिपेंडन्सी वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आलं. त्याच्या यकृताचं काम, रक्तप्रवाह, रक्त गोठण्याची प्रक्रिया, किडनीचं आरोग्य आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण यावर डॉक्टरांनी सतत लक्ष ठेवलं. शरीराने नवीन यकृत नाकारू नये आणि संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक औषधे देण्यात आली.

हॉस्पिटलमधील १५ दिवसांच्या उपचारांनंतर शिव हळूहळू अन्न खाऊ लागला. त्याच्या वेदनाही कमी झाल्या. शिवच्या आईला शस्त्रक्रियेनंतर पाच दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. घरी गेल्यानंतर बाळाला वेळेवर औषधं देणं, धोक्याची लक्षणं ओळखणं आणि नियमित तपासणी करणं याबाबत कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यात आलं

Liver transplant
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरपूर्वी शरीरात होणारे हे 5 बदल वेळीच ओळखा; 90% महिला करतात दुर्लक्ष

वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे - डॉ. आदित्य कुलकर्णी

या प्रकरणाबाबत बोलताना नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि यकृतविकार तज्ज्ञ डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी सांगितलं की, गंभीर जनुकीय आजारासोबत हृदय आणि किडनीच्या समस्या असलेल्या लहान बाळावर यकृत प्रत्यारोपण करणं अत्यंत आव्हानात्मक असतं. कमी वजनाच्या बाळामध्ये अशा शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळ्या विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांचे योग्य नियोजन आणि समन्वय आवश्यक असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.