Shinde Group MLA Fights: शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधानभवनात काय घडलं? शंभुराज देसाईंनी सगळंच सांगितलं
Clash Between Eknath Shinde Group MLA
महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेचं शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी खंडण केलं आहे. विधानभवनात दोन आमदार मोठ्या आवाजात बोलले, तर त्याला एकमेकांना भिडणे असं म्हटलं जात नाही. असा कोणताही वाद विधानभवनात झाला नाही, असं देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विधानभवनात नेमकं काय घडलं?
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेचा भडीमार करीत आहेत. अधिवेशनाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विधानभवनात राज्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सभागृहामध्ये आले होते. तेव्हा त्यांच्यासोबत भरत गोगावले आणि इतर आमदार देखील होते. मुख्यमंत्री शिंदे सभागृहात आल्यानंतर विकासकामांबाबत चर्चा करताना शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केली.
दरम्यान, शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधानभवनातच वाद झाल्याची बातमी राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. काही माध्यमांनी तर दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त दिलं. हे वृत्त समोर येताच शिंदे गटाचे आमदार शंभुराज देसाई तातडीने विधानभवनाच्या बाहेर आले. नेमकं विधानभवनात काय घडलं? याबाबत त्यांनी माध्यमांना उलगडून सांगितलं.
काय म्हणाले शंभुराज देसाई?
विधानभवनात असा कोणताही राडा झालेला नाही. माध्यमांकडे काय पुरावा आहे, असं म्हणत देसाई पत्रकारांवर चांगलेच भडकले. लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही कसे चालवता, असं म्हणत शंभुराज देसाईंनी आमदारांमध्ये वाद झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं. चर्चा करताना दोन्ही आमदारांमध्ये फक्त आवाज वाढला होता. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का, असा सवाल शंभुराज देसाईंनी विचारला आहे.
आमदारांच्या वादावरून महाविकास आघाडीचं टीकास्त्र
दरम्यान, दादा भुसे आणि महेंद्र थोरवे वादावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. कोण भिडले, कोण नाही भिडले, हे मला माहित नाही, पण हे गंभीर आहे. या महाराष्ट्राने महान नेत्यांची परंपरा पाहिली आहे, पण असा प्रकार कधी झाला नाही. विधानसभेचे नाव लौकिक होते पण, त्याला आज काळिमा फासला गेला. राजकारणातली आपण आपली क्रेडिबीटी संपवत चाललो आहोत, अशी टीका आव्हाड यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.