अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनीधी
कल्याण : मुंबई-गोवा महामार्गावरून डोंबिवलीत शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली होती. त्यानंतर नेत्यांमध्ये शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे. डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी रविवारी रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलं. 'खड्ड्यातून मॅरेथॉन करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे, अशी टीका युवा सेनेने केली होती. या टीकेला भाजप पदाधिकाऱ्यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.
भाजपचे पदाधिकारी नंदू परब ,संदीप माळी यांनी 27 गावातील खड्डे भरण्याचा कामात टक्केवारी कोणी खाल्ली, असा सवाल केली. तसेच आमच्या नेत्यांवरील टीका सहन करणार नाही. आरेला कारे करू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
परब यांनी भाजप नेहमीच महायुती धर्म पाळतो, मात्र शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांचा प्रचार केला नसल्याचा गंभीर आरोप देखील केला. महायुतीतील भाजप व शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले. लोकसभेमध्ये एकमेकांचे कौतुक करणारे पक्ष आता एकमेकांविरोधात उभे ठाकायला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे.
शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग यावरून अप्रत्यक्षरीत्या भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. कदम यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं. हा वाद शमतो ना शमतो, तोच शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांवरून अप्रत्यक्षरीत्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
27 गावातील रस्त्यांवर पडलेला खड्ड्यांसाठी रवींद्र चव्हाण निधी मंजूर करतात. मात्र टक्केवारी कोण खातं याचा शोध घेतला पाहिजे,असं सांगत एक प्रकारे शिवसेनेच्या कोर्टात बॉल टाकला. पुढे बोलताना भाजपाचे उपाध्यक्ष नंदू परब कल्याण ग्रामीणचे भाजपाचे पदाधिकारी संदीप माळी यांनी थेट टक्केवारीचा मुद्दा अधोरेखित करत संशय व्यक्त केलाय? टक्केवारी कोण खातं? हे तपासलं पाहिजे, असं भाजपचं म्हणणं आहे.
'आमच्या नेत्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात परब यांनी खडेबोल सुनावलेत. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये आम्ही ग्राउंड लेव्हलपासून काम केलं, मात्र कोकण पदवीधर मतदारसंघात मला मित्रपक्षाने मदत केली नाही, अशी नाराजी सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली. कल्याण डोंबिवली शहरातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. इतकाच नाही तर भाजपने आपल्या मित्र पक्षावर संशय देखील व्यक्त केलाय. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपमध्ये फारच काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.