
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'युती'चा तिढा!
'युती करू नका मग तुमची अवस्था काय होती ती बघा'
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा शिंदे गटाला इशारा.
संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहे. प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागलेला दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटानेही आपली कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. शिंदे गटासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुक ही फार महत्वाची आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण डोंबिवली हा बाल्लेकिल्ला मानला जातो. त्यातच श्रीकांत शिंदेही कल्याणचे खासदार आहेत. भाजपसाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
त्यामुळे शिवसेना आणि भाजप यात युती होते की दोघे स्वतंत्र लढणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यात उबाठा आणि मनसे एकत्र आले आहे, त्यामुळे एक वेगळाच रंग या निवडणुकीला आला आहे. या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अशातच शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या एका कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'याल तर सोबत, नाहीतर... आडवे करू...कुणाला वाटत असेल बिना युतीने, कुठलंही काम न करता आम्ही निवडून येऊ शकतो, तर आम्ही स्वतः लढायला तयार आहोत' असं थेट आव्हान त्यांनी भाजपला दिले होते.
यावर अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी प्रतिक्रिया दिली. 'जर युती धर्म मोडला तर, आमच्याकडेही भाजपचे कार्यकर्ते आहेत. वेळ आली तर त्यांना सोबत घेऊ', असा इशारा त्यांनी दिला होता.
यानंतर भाजपनेही शिंदे गटाला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले, 'शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा अभ्यास कमी आहे. ज्या वेळी युती झाली, त्या वेळी तुम्ही गद्दारीच केली. भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्याचा साक्षीदार मी सुद्धा आहे'.
'तर, बालाजी किणीकरही युतीमुळे आमदार झाले आहे. युती करू नका मग काय अवस्था होते ते पाहा..' असं ओपन चॅलेंज देत नरेंद्र पवार यांनी हल्लाबोल केला. शेवटी त्यांनी सांगितले की, 'केंद्रात राज्यात आपली युती आहे. महागरपालिकेतही युती होईल. युतीमुळे तुमचाच फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपला बाजूला करण्याची भाषा करू नका, युतीत मिठाचा खडा टाकू नका', अशी विनंती वजा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.