पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर 2026 रोजी बारामती दौऱ्यावर येणार
विद्या प्रतिष्ठानच्या परिसरातील ‘प्रेरणास्थळा’च्या कार्यक्रमात मोदी उपस्थित राहणार
गौतम बुद्धांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मोदींच्या उपस्थितीत होणार
महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरडा दुष्काळ पडला. यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पवार यांनी शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळ’ या मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांना बारामतीत येण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासह संबंधित मंत्री आणि विद्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पाठपुरावा केला. आता ३ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठानच्या कॅम्पसमधील कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात प्रेरणास्थळाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी भव्य डोम तयार करण्यात आला असून, त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे.
या प्रेरणास्थळामागे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मचिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची भावना निर्माण करण्याचा उद्देश आहे. विविध महान व्यक्तिमत्त्वांची भव्य छायाचित्रे येथे लावण्यात येणार आहेत. त्यांच्या जीवनकार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या आयुष्यात मूल्यांची जोपासना करावी, अशी या संकल्पनेमागील भूमिका आहे. या कार्यक्रमासाठी देशातील उद्योगजगत, शैक्षणिक संस्था आणि विविध फाउंडेशनच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या नेतृत्वासह ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य संस्थांशी संबंधित मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.