'भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल, तसा राज्यपालांना...'; शिवसेनेची बोचरी टीका

सामनातून राज्यपालांसह भाजपवर टीका करण्यात आली.
Maharashtra cm new update Eknath Shinde
Maharashtra cm new update Eknath ShindeSaam TV

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आलं. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा महाविकास आघाडीला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, रविवारी विधानसभा अध्यक्षपदावर राहुल नार्वेकर यांची निवड करून शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. (Shivsena Latest News)

Maharashtra cm new update Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारची दुसरी परीक्षा; आज विश्वासदर्शक ठराव होणार

सामनाच्या अग्रलेखात काय?

"घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही". अशी खंत सामनातून मांडण्यात आली आहे.

"आता प्रश्न राहिला राज्यपालांच्या टेबलावर गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांचा. आता नवे सरकार आले आहे. त्यामुळे त्या फाईलच्या जागी नवी फाईल आणून ती चोवीस तासांत राज्यपालांच्या सहीने मंजूर होईल व पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुनः पुन्हा होत राहील. काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल" असंही सामनाच्या अग्रलेखात मांडण्यात आलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Maharashtra cm new update Eknath Shinde
भाजप मोहित कंबोज यांना राज्यपाल नियुक्त आमदार करणार?; 'या' नेत्यांना मिळणार संधी

"शिंदे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. कधी, कुठे टांग टाकायची हे त्यांना कळते. भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करण्याची कुवत आणि हिंमत नाही. शिवसेनेतच तोडफोड करून त्यातील एखादा शिवसेनेच्या विरोधात उभा केला जातो". अशी टीका करण्यात आली.

"विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने जिंकली यात आम्हाला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. राहुल नार्वेकर यांना 164 आमदारांनी मतदान केले. शिवसेनेचे राजन साळवी यांच्या बाजूने 107 मते पडली. शिंदे गटाच्या भाजपपुरस्कृत आमदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू होईल, पण आता हे सर्व टाळण्यासाठीच विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपने कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस बसवले व त्याबरहुकूम त्यांना हवे तसे निर्णय घेतले जातील. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदेशीर आहे, पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही". असे टीकास्त्र सुद्धा सामनातून करण्यात आलं आहे.

Maharashtra cm new update Eknath Shinde
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची बॅनरबाजी; शिवाजी पार्क परिसरात बॅनर

'अनैतिक कृत्यात राज्यापालांनी सहभागी व्हावे'

"शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते. शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान…असे बरेच काही होते. ‘‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’’ असे गर्जले जात होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? पण हे आमदार कावरेबावरे होऊन केंद्रीय बंदोबस्तात आले व त्यांनी विधानसभेचा अध्यक्ष निवडला. ही निवड बेकायदेशीर आहे, लोकशाही व नैतिक अधिष्ठानास धरून नाही. या अनैतिक कृत्यात आपल्या महामहिम राज्यपालांनी सहभागी व्हावे याचे आता कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही". अशी टीका देखील सामनातून करण्यात आली.

"महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा म्हणजे हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे सरकार पायउतार झाल्याचा सगळय़ात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा, तर क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा. नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना त्याच आनंदाच्या भरात राज्यपालांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील पेढय़ांची दुकाने बंद पडली असावीत. श्री. शरद पवार म्हणतात ते विधान गमतीचे असले तरी खरेच आहे. ‘मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही,’ असे शरद पवार म्हणाले ते बरोबरच आहे". असा घणाघातही सामनातून राज्यपालांवर करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com