

कल्याण पश्चिमेत रिडेव्हलपमेंटवरून दोन गटांत हाणामारी
लोखंडी रॉड, विटा आणि दांडक्यांचा वापर करून हाणामारी
हाणामारीत 3 ते 4 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पश्चिमेतील शिवनेरी पार्क आणि शिवधाम सोसायटी परिसरात रिडेव्हलपमेंट सुरू असताना सुरक्षा भिंतीच्या वाद झाला. या वादातून दोन विकासक गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात लोखंडी रॉड, विटा आणि लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला आहे. या घटनेत 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाणे येथे दोन्ही गटांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी एकूण 14 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या पोलिस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिडेव्हलपमेंट अंतर्गत असलेल्या जुन्या सुरक्षा भिंतीवरून हा वाद निर्माण झाला. विकासक प्रताप ढोबळे यांच्या तक्रारीनुसार, संबंधित भिंत विनापरवाना पाडली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतरही जेसीबीच्या सहाय्याने भिंत पाडण्याचे काम सुरूच ठेवण्यात आलं.
ढोबळे काम थांबवण्यासाठी ते घटनास्थळी गेले. त्यावेळी दुसऱ्या गटाकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसरीकडे विकासक मिलिंद चव्हाण यांनीही प्रत्युत्तर देताना सांगितले की, सोसायटीच्या सदस्यांनी अधिकृतपणे त्यांची विकासक म्हणून नियुक्ती केली असून भिंत काढण्याचे काम सुरू असताना ढोबळे गटाने कामगारांना धमकावून मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यातही धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावर प्रताप ढोबळे यांनी पलटवार करत, त्यांच्या प्रोजेक्टच्या जागेत अतिक्रमण करून जागा बळकावण्याच्या उद्देशाने भिंत तोडली जात होती आणि अनधिकृत बांधकामाचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. मोठे विकासक असल्यामुळे दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची सखोल चौकशी सुरू आहे. एका सुरक्षा भिंतीच्या वादातून उफाळलेला हा बिल्डर विरुद्ध बिल्डर संघर्ष थेट रस्त्यावर आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.