Mumbai Rains Red Alrt: मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. प्रभादेवी, वरळी, लालबाग, कुर्ला, अंधेरी सबवेसह मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. रात्रभर झालेल्या पावसामुळे दादर स्थानकात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील काही तास मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुंबई आणि पालघरसाठी पुढील ३ तासांसाठी 'रेड नाऊकास्ट' (Red Nowcast) इशारा जारी केला आहे. त्यामुळे गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.
मुंबईत आज पावसाने जोरदार (धुवादार) बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या तीव्र उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात छान गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील गांधी बाजार आणि किंग्ज सर्कल परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून हा संपूर्ण भाग जलमय झाला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. पाण्याचा निचरा योग्य रीतीने न झाल्याने आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईत कालपासून पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पहिल्याच जोरदार पावसात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सायन हायवेजवळील एरवाडनगर येथील सबवेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून हा सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. आजच्या दिवसाची सुरुवातच मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचण्याने झाली आहे, ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई आणि पालघरसाठी 'रेड नाऊकास्ट' इशारा
मुंबईत रात्रभर पावसाने धुमाकूळ घातलाय. पावसाचे जोरदार आगमन होताच भारतीय हवामान खात्याने (IMD) बुधवारी (२४ जून) सकाळी मुंबई आणि शेजारील पालघर जिल्ह्यासाठी 'रेड नाऊकास्ट' (Red Nowcast) अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि पालघरच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
ट्रान्सहार्बर रेल्वे ठप्प होण्याचं मुख्य कारण समोर; रेल्वे ट्रॅकखालील माती घसरली!
मुंबई आणि उपनगरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ट्रान्सहार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे बंद पडण्याचं मुख्य कारण आता समोर आलं असून कोपरखैरणे ते घणसोली दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गिका गेल्या ४५ मिनिटांपासून पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू असून, सेवा पूर्ववत होण्यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाणे-वाशी आणि पनवेल मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
उल्हासनगर-अंबरनाथमध्ये रिमझिम पाऊस; स्टेशनबाहेर साचले पाणी
उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या असह्य उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात कुठेही पूरसदृश परिस्थिती किंवा मोठी पाणी साचल्याची घटना घडलेली नाही. मात्र, शहरातील सखल भागात आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांवर पाण्याचे डबके साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील पार्किंगच्या जागेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, ज्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.