Raj K Purohit Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन
Mumbai Raj Purohit Passes Away : मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन झाले. ते ७० व्या वर्षाचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राज पुरोहित यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषावले आहे. २५ वर्षांहून अधिक काळ ते आमदार राहिले होते. युती सरकारमध्ये पुरोहित यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले.
राज के पुरोहित यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह भाजपवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भजपच्या ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला आहे. राज पुरोहित यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १ वाजता चंदनवाडी सोनापूर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव मरीन ड्राइव्ह येथील जी रोडवरील त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
राज पुरोहित हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी रात्री उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. राज के पुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील भाजपचा एक मजबूत आधारस्तंभ मानले जात होते. मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून पुरोहित ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. कामगार आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी युती सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
राज के. पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित हा नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २२१ मधून विजयी झाले. पुरोहित यांनी यापूर्वी या प्रभागातून नगरसेवक म्हणून काम केले आहे. आता आकाश यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा हाती घेतला आहे. दरम्यान, राज पुरोहित यांच्या निधनाने त्यांच्या समर्थकांमध्ये, मुंबई भाजपमध्येही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी हितचिंतकांची गर्दी झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

