Mumbai Goa Highway Traffic Today: रायगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पेणजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. या कोंडीचा फटका सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील बसला असून तब्बल अर्ध्या तासांपासून त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकून पडल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज म्हणजे शनिवारी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत. त्यांचा हा चौथा पाहणी दौरा असून मनसेच्या गांधीगिरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.
यापूर्वी याच महिन्यात मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दोनवेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांचा ताफा रायगडकडे निघाला असताना मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोडी झाली. या कोंडीचा फटका चव्हाण यांच्या ताफ्याला देखील बसला. त्यांचे कार जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडली होती.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीचा मुद्दा (Traffic Jam) सातत्याने समोर येत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारविरोधात आंदोलंनही केली आहे.
मुंबई गोवा महामार्ग मार्गाचे काम गेली 12 वर्षे रखडले आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. दरम्यान या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मनसेने आंदोलन पुकारले आहे.
उद्या रविवारी २७ ऑगस्टला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार असून संध्याकाळी कोलाड येथे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होणारी अमित ठाकरे यांची पदयात्रा आणि राज ठाकरे यांची सभा या पार्श्वभुमीवर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा आजचा दौरा महत्वपूर्ण आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.