पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ला चढताना ३५ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे पर्यटकाचे नाव
हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्याची सफर करण्यासाठी आलेल्या ३५ वर्षीय पर्यटकाचा किल्ला चढताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव असून, शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिज्ञेश खंडाळकर हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे वास्तव्यास होते. शनिवारी ते पुण्यातील अन्य दोन युवकांसोबत ऐतिहासिक राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी ते पाल बुद्रुक मार्गाने गड चढत होते.
राजगड किल्ला चढत असताना दुपारी दोनच्या सुमारास जिज्ञेश यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. हा प्रकार लक्षात येताच सोबत असलेल्या मित्रांसह परिसरातील नागरिक आणि इतर पर्यटकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. जिज्ञेश यांना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यांना वाचवण्यासाठी उपस्थितांनी प्रयत्न केले. मात्र, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
जिज्ञेश खंडाळकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे अधिकृत कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आणि दुर्गप्रेमी या किल्ल्याला भेट देतात. मात्र, गड चढताना अचानक उद्भवलेल्या या घटनेमुळे पर्यटकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.