

पुणे महापालिका निवडणुकांची घोषणा होताच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले
निवडणुकीपूर्वी पुण्यातील राजकीय वातावरण तापले
धंगेकरांविरोधात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत
प्रभाग २४ मधून ते निवडणूक लढवणार आहेत
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची सोमवारी घोषणा केली. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने तयारीला लागले असून सर्वपक्षीय पातळीवर उमेदवारी अर्जांचे वाटपही सुरू झाले आहे. राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाही नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.
प्रभाग २४ मधून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणय धंगेकर हेही याच प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. बीडकर आणि धंगेकरांसमोर सुनील पवारांचं आव्हान असणार आहे. पुणे पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले सुनील पवार यांनी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपण प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या पक्षातून निवडून येण्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सुनील पवार यांनी पोलिस दलात तब्बल ३४ वर्षे सेवा बजावली आहे. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ते सेवानिवृत्त झाले. मूळचे पुण्याच्या रास्ता पेठेतील असलेले पवार यांचा परिसरात चांगला लोकसंपर्क आहे. पोलिस सेवेत असताना त्यांनी जनतेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.'पोलिस दलात राहून ३४ वर्षे जनतेची सेवा केली. आता नगरसेवक म्हणून पुणेकरांची सेवा करण्याची इच्छा आहे.', असे मत सुनील पवार यांनी व्यक्त केले आहे. प्रभाग क्रमांक २४ मध्ये आपली ओळख आणि जनसंपर्क मजबूत असल्याने आपण निवडून येऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र सध्या त्यांची प्रतीक्षा आहे ती केवळ तिकिटाची.
दरम्यान, याच प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर यांचा मुलगा देखील निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या सर्वांसमोर सुनील पवार यांचा निभाव लागतो का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महापालिका निवडणुकांचे वेध लागल्याने सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची मोठी रांग लागली आहे. अशा परिस्थितीत ३४ वर्षे खाकीची सेवा केलेल्या सुनील पवार यांना कोणता पक्ष जवळ करतो आणि त्यांना उमेदवारी मिळते का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.