

ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करतात. या मुद्द्यावरून विधानसभेत चर्चा झाली. आमदार सुनिल शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला अनेक प्रश्न केले. तर यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देत अशाप्रकारे कारवाई करण्याचे आदेश ट्राफिक पोलिस सोडून इतर कोणत्याही पोलिसांना अधिकार दिले नसल्याचे स्पष्ट केले.
आमदार सुनिल शिंदे विधानपरिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करताना म्हणाले की, 'मुंबईसह शहरी भागात चुकीच्या पद्धतीने पार्क होणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलनद्वारे कारवाई केली जाते. तुम्ही उत्तरात सांगितले की, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी तुम्ही याठिकाणी आदेश निर्गमित केले आहेत की जे अधिकृत मोबाईल आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या हातात दिले आहेत. त्याच मोबाईलद्वारे चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. याबाबत तुम्ही सहमती दर्शवली आहे.
'पण वाहतूक पोलिसांना हे अधिकार दिलेले असताना देखील स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी मग ते पोलिस मोबाईल व्हॅन किंवा मोटार सायकलवरून जाणारे पोलिस असतील किंवा निर्भया पथक यांच्याकडून देखील मोबाईलवर फोटो काढून वाहन चालकांवर कारवाई केली जाते. तर हे त्यांना अधिकार दिले आहेत का? जर त्यांना हे अधिकार दिले असतील तर शासनाने त्याबाबत स्पष्टता करावी आणि अधिकार दिले नसतील तर यासंदर्भात त्यांच्यावर भविष्यात कोणती कारवाई करणार ते सांगावे.', अशी मागणी सुनिल शिंदे यांनी केली.
सुनिल शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, '६ ऑक्टोबर २०२५ ला मुंबई पोलिस महासंचालकंनी मुंबई शहर आणि महाराष्ट्रातील काही भागांमधील ट्रान्सपोर्टरच्या तक्रारी आल्यानुसार यासंदर्भात बैठक घेत हा मुद्दा मांडला होता. यासंदर्भात पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. एखादा पोलिस प्रायव्हेट मोबाईलमध्ये अशाप्रकारे फोटो काढून नंतर ते अपडेट करत असतील तर हे चुकीचे आहे. तसे होऊ नये यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ट्राफिक पोलिस सोडून इतरांना असे अधिकार दिलेले नाहीत. संबंधित सर्व विभागांना पत्रव्यवहार केला आहे.'
तर, 'पत्रव्यवहार झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये एका पोलिसावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. ई-चलानच्या बाबतीत अधुनिकिकरण करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यासाठी आदेश दिले आहेत. आपण अन्य राज्यात आणि परदेशात पाहतो की पोलिसांच्या बॉडिवर कॅमेरे असतात आणि त्या कॅमेऱ्यात जी कारवाई करतात ते रेकॉर्ड होतात. त्या अनुषंघाने आपल्या महाराष्ट्रात देखील ट्राफिक हवालदारांमार्फत ई-चलान किंवा जी कारवाई कशी करतात ते रेकॉर्ड करता येईल का ते आम्ही पाहत होतो. कारवाई करताना ती रेकॉर्ड होईल का यासाठी ट्राफिक पोलिसांना बॉडी कॅमेरा वापरता येईल का? याबाबच मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.', असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.