.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे शहरात आज टिळक रोड विसर्जन मिरवणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला विसर्जनाच्या दिवशी टिळक रोडवरून जाणाऱ्या गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी टिळक रोडवरील समस्या पोलिसांच्या पुढे मांडल्या. यावेळी विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी डीजेला वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
या बैठकीमध्ये टिळक रोडवरून विसर्जनाच्या दिवशी जाणारे गणेश मंडळ,विद्युत रोशनाई, साऊंड सिस्टिम, विसर्जन मिरवणुकीसाठी लागणारा वेळ यासारख्या विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जनाच्या दिवशी टिळक रोडवरून २०५ गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ होतात. या विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनाबाबत आज पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचं नियोजन मांडले.
यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'मागील वर्षी आमचं टिळक रोडच्या नियोजनावर दुर्लक्ष झालं. आम्ही दखल घेतली पण त्याचा निकाल चांगला नव्हता येत. मागील वर्षी आम्ही या रस्त्याचं नियोजन करू असं ठरवलं होतं. एक अधिकारी टिळक रोडवरील पुरम चौकचे नोडल ऑफिसर असतील. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी असलेल्या डीजेंना दुसऱ्या दिवशीसाठी वेगळी परवानगी लागणार नाही. पूर्णपणे निर्बंध मुक्त गणेशोत्सव राहील. पण कार्यकर्त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून वागावे.'
अमितेश कुमार यांनी यावेळी असे आदेश दिले की, 'पोलिस अधिकाऱ्यांनी सगळ्या मंडळाच्यासोबत बैठक घ्या. १० व्या दिवशीची परवानगी ११ व्या दिवशीसाठी चालेल. याबाबतचा लिखित आदेश येतील. मिरवणुकीच्या दिवशी शाळेच्या आवारात पार्किंग व्यवस्था याबाबत विचार करु. टिळक रोडवर सुद्धा एक स्वागत कक्ष उभारले जातील. शक्य आहे का नाही माहिती नाही पण आपली साथ असेल तर टिळक रोडची मिरवणुकीचा मुख्य सोहळा १२ वाजेपर्यंत संपवू. गणेश भक्त यांच्यासोबत पुणे पोलिस दल उभे आहे. फक्त आपण आपल्या स्तरावर कार्यकर्ते शिस्तीचे पालन करतील हे बघा. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणी दारू विकत असेल तर अशी कारवाई करा की ते मालक ७ पिढ्या विसरणार नाहीत.'
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष जे साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा भाषण केले. यावेळी बोलताना धीरज घाटे म्हणाले, 'आमच्या टिळक रोडकडे कुणी लक्ष देत नाही. आम्ही नावडते झालो आहे. फक्त लक्ष्मी रस्त्याबाबत बोलले जातं, टिळक रोडवर कुणीही लक्ष देत नाही ही खंत आहे. विसर्जनाच्या दिवशी अधिकारी चांगले द्या. अनेकवेळा मिरवणूक तिथंच अडकून राहते. यंत्रणा यंदाच्या वर्षी चांगल्या पद्धतीने लावा. खूप वेळ लाईनला लागायलाच जातो. चांगला अधिकारी तिथे नेमा आम्ही सगळे पोलिसांसोबत आहोत. फक्त मिरवणूक नीट व्हावी. स्पीकर लावणारी आणि ढोल- ताशा लावणारी मंडळ देखील तुम्हाला सहकार्य करतील. लवकर आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघणार. सगळं जर व्यवस्थित पार पडल तर पोलीस आयुक्तांचा शनिवार वाड्यावर सत्कार करु.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.