अक्षय बडवे| पुणे, ता. २ सप्टेंबर २०२४
पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात खून, मारामाऱ्या, कोयगा गँगची दहशत यासोबतच महिला अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांनीही कळस गाठला आहे. शहरामध्ये शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींचे छेड काढल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. दुसरीकडे आता गणेशोत्सव काळातही दर्शनाला येणाऱ्या महिलांंना त्रास देण्याचे प्रकार घडतात. यावर पुणे पोलिसांनीही कठोर पाऊले उचलली असून आता छेड काढणाऱ्या रोडरोमियोंचे भरचौकात बॅनर लावले जाणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात महिला, महाविद्यालयीन मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना आता पोलीस चांगलीच अद्दल घडवणार आहेत. पुण्यात महिला, तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंचे फोटो आता चौकामध्ये लावले जाणार आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ही नवी शक्कल लढवली आहे.
चार दिवसांनंतर शहरात गणपती उत्सवाच्या जल्लोषाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. तसेच अशा रोडरोमिओंची परेडदेखील घेतली जाणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात पुणे पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असून मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्य भागात 18 पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये पोलीस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असतील. मोबाईल चोरी, महिलांकडील दागिने चोरणारे चोरट्यांची माहिती घेणं सुरू असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
पुणे शहरामध्ये बारा तासात दोन खूनाच्या घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी शहरातील नानापेठ परिसरात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा खून करण्यात आला. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव असून शतपावली करत असताना अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करत ही हत्या केली.
विक्रीसाठी ग्राहक शोधत असलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कुणाल संतोष लांडगे (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, डी पी रोड, औंध) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कुणाल लांडगे याच्याकडे गावठी पिस्तुल आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.