Pune : पुणे पोलीस दलात खळबळ!पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कर्मचाऱ्याचा गोंधळ; बदल्यांवरून नाराजीचा मुद्दा ऐरणीवर

Pune Police Department : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्याबाहेर पोलीस कर्मचारी अमोल भिसे याने कथित मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.
Pune Police Department
Pune Police Departmentsaamtv
Published On: 

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बंगल्याबाहेर एका पोलीस कर्मचाऱ्याने कथित मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. अमोल भिसे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, मनासारखी बदली न झाल्याने त्याने थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर जाऊन शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने पोलीस दलातील बदल्या, कर्मचाऱ्यांमधील नाराजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमोल भिसे हा पोलीस कर्मचारी चारचाकी गाडी घेऊन पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचला. त्यानंतर त्याने कथित मद्यधुंद अवस्थेत बंगल्याबाहेर गोंधळ घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. भिसे याची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र, ही बदली मनासारखी न झाल्याने तो नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीतून त्याने थेट पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर जाऊन गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे.

Pune Police Department
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; सुरुवातीच्या निकालांत रिपब्लिकन पक्षाची पिछेहाट

या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र, या प्रकरणातील नेमके आरोप, गुन्ह्याची नोंद आणि पुढील कारवाई याबाबत अधिकृत पुष्टी आवश्यक आहे.

पोलीस आयुक्तांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

या घटनेमुळे केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चर्चा सुरू झालेली नाही, तर पोलीस दलातील अंतर्गत नाराजीचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळाला जवळपास तीन वर्षे होत आली असून, या काळात कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईबाबत दुजाभाव केला जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.

Pune Police Department
Railway Track Blast : भारत-पाक सीमेवर मोठा स्फोट! ट्रेन जाताच रेल्वे ट्रॅक उडाला; संपूर्ण परिसर हादरला

वसुलीच्या आरोपांवरूनही चर्चा

पुणे पोलीस दलातील कथित वसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी यापूर्वी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.. संबंधित कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. मात्र, या कारवाईनंतरही काही भागांत वसुलीचे प्रकार सुरूच आहेत. याशिवाय, पूर्वी कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही जण अद्याप अशा प्रकारांत सहभागी आहेत.

काही अधिकाऱ्यांना वेगळा न्याय मिळतोय का?

पोलीस दलात एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर घटना घडल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची तातडीने बदली किंवा त्याच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाते. मात्र, काही प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर तशीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

आयुक्तांच्या बंगल्याबाहेर गोंधळ म्हणजे व्यवस्थेतील नाराजीचा संकेत?

पोलीस दलात शिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश यांना विशेष महत्त्व असते. अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याने थेट पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याची घटना गंभीर मानली जाते.