
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुण्यात भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने भीमराव यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर आमदार भीमराव तापकीर यांनी थेट पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनी भीमराव यांच्या घरात तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरक्षारक्षकाने केला. मात्र, त्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या प्रकरणात भीमरावांनी आधीही त्याच्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरूवातीला आरोपीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याचे गोंधळ घालण्याचे सुरूच होते. या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवलं आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार, उपायुक्तांनी कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपीला बुधवारी अटक केली असून, त्याच्याविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1), भारतीय दंड संहिता कलम 352 (उपद्रव करणे), 351(2)(3) (आक्रमणाची धमकी), 132 (सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला), 333 (कर्तव्य बजावत असलेल्या लोकसेवकाला दुखापत करणे), पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम, 1922 अंतर्गत कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.