पुण्यात PMPML बस चोरीचा धक्कादायक प्रकार
शिवाजीनगर परिसरातून बस चालवत नेली
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले
कोणतीही जीवितहानी नाही
सुरक्षेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह
सचिन जाधव, पुणे
पुण्यातील पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) बस चोरीप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजीनगर परिसरात पार्क केलेली बस एका तरुणाने थेट चालवत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अखेर आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालसिंग बलबिरसिंग राणा (वय अंदाजे २०, मूळ रा. उत्तराखंड) असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार काल सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घडला. शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळ पीएमपीएमएलची बस उभी होती. त्या वेळी बसमध्ये चावी लावलेली असल्याची संधी साधत आरोपीने बसमध्ये प्रवेश केला आणि ती सुरू करून थेट रस्त्यावर घेऊन गेला.
यानंतर आरोपीने ही बस जंगली महाराज रस्त्याने चालवत डेक्कनच्या दिशेने नेली. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. डेक्कन पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुडलक चौक परिसरात आरोपीला बससह ताब्यात घेतले. सुदैवाने या संपूर्ण प्रकारात कोणतीही जीवितहानी किंवा अपघात झाला नाही.
हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे संबंधित आरोपीविरोधात मोटार व्हेईकल ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या घटनेमुळे पीएमपीएमएलच्या सुरक्षेच्या नियमांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून आरोपीने ही कृती नेमकी कोणत्या हेतूने केली याचा शोध घेतला जात आहे. तसेच, पीएमपी प्रशासनाकडून या प्रकरणी कोणती कारवाई केली जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.