सचिन जाधव साम टीव्ही
अनैतिक संबंध कायम ठेवता यावे यासाठी एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव सर्वांसमोर केला. मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. हा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
गोपीनाथ बाळू इंगुळकर (वय ३७, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२) आणि नितीन शंकर ठाकर (वय ४५, रा. कुरण, ता. वेल्हा, जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनं कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गोपीनाथ हा मार्केटयार्डात हमालीचे काम करीत होता. त्यांची पत्नी राणी एका वसतिगृहात साफसफाईचे काम करते. यादरम्यान राणीचे ठाकर याच्यासोबत सूत जुळले. दोघांनी अनेकवेळा अनैतिक संबंध प्रस्थापित केले. याची कुणकुण राणीच्या पतीला लागली. त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी राणी हिने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. यासाठी तिने प्रियकर ठाकर याची मदत घेतली. रविवारी मध्यरात्री गोपीनाथ हा राहत्या घरी गाढ झोपला होता. घरात दुसरे कुणीही नसल्याची संधी साधत राणीने प्रियकराला घरी बोलावले.
दोघांनी मिळून गोपीनाथ याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचे राणीने पोलिसांना कळविले. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.