नितीन पाटणकर| पुणे, ता. २४ ऑगस्ट २०२४
गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरुन राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी यांच्यासह प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तोंडावर काळा मास्क लावून निषेध आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन केले. पुणे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळा मास्क, हाताला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त केला.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर, रमेश बागवे, मोहन जोशी, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. आंदोलनादरम्यान, पावसानेही जोरदार हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी सर्वांसमोर प्रतिज्ञा वाचून घटनेचा निषेध केला.
"बदलापुर सारख्या अनेक घटना महाराष्ट्रात होत आहेत. सरकार अंसवेदनशील आहे. बदलापुर येथील आंदोलनकर्ते बाहेरचे होते, असे म्हणतात. पण ते भारतीय होते. त्यांनी आंदोलन केले तर काय चुकले. पुण्यात रक्त बदलले जाते, ड्रग माफीया पळुन जातो, कोयता गँग आहे. पुण्यात अशी परिस्थिती आहे. सरकारचा आणि त्या कृत्याचा जाहीर निषेध करते," असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.