बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, सरकारने कोर्टात धाव घेऊन हा बंद बेकायदेशीर ठरवला. यावरून शिवसेना ठाकरे गटाने महायुतीवर टीकेची तोफ डागली आहे. सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला चिमटे काढण्यात आले आहेत.
"महाराष्ट्रातील कोलमडून पडलेली कायदा व सुव्यवस्था आणि नराधमांकडून होणारे स्त्रीअत्याचार याविरोधात पुकारलेला आजचा ‘बंद’ मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा वगैरे ठरवला आहे. हे धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. या चिमुकल्यांवरील अत्याचारांना, त्यांच्या दडपून टाकलेल्या आक्रोशाला विरोधी पक्षांनी नाही तर कोणी वाचा फोडायची?" असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आलाय.
"सध्याचे बेकायदा सरकार न्यायालयाला चालते, त्याबाबत ‘तारीख पे तारीख’ सुरू राहते आणि राज्यात विकृत नराधमांनी घातलेल्या उन्मादाविरोधात उफाळून आलेल्या जनतेच्या उद्रेकावर मात्र न्यायालय बेकायदा असा शिक्का मारते. त्याला रोखते. संविधानात लोकभावनेला किंमत आहे, परंतु न्यायालयाला ती नाही, असा अर्थ कोणी काढला तर?" असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलंय.
"शिंदे आणि फडणवीसांचे ‘सदा’ आवडते याचिककर्ता बनून न्यायालयात जातात आणि न्यायालय जनतेचा उद्रेक ‘बेकायदा’ ठरवते. हेच याचिकाकर्ते मराठा आरक्षणालाही ‘आडवे’ गेलेच होते. त्या वेळी जरांगे यांनी गृहमंत्री फडणवीसांवर आरोप केले होते. ते आता खरेच ठरले असे म्हणावे लागेल", अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
"पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघ परिवारातील दंडुक्याप्रमाणे तो निर्जीव आणि निक्रिय बनवल्याने राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वापर, हत्या, बलात्कार, अपहरण, धमक्यांचे प्रमाण वाढले आहे व या गुन्हेगारीची सूत्रे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून चालवली जात असतील तर महाराष्ट्राची अवस्था आज आहे त्यापेक्षा बिकट झाल्याशिवाय राहणार नाही", असा इशाराही सामना अग्रलेखातून देण्यात आलाय.
"संपूर्ण राज्यात मुलींवरील अत्याचारांत वाढ झाली. दौंड, जळगावातील अमळनेर अशा ठिकाणी बदलापूरप्रमाणे घटना चार दिवसांत घडल्या. मुली कोठेच सुरक्षित नाहीत. शिक्षक, डॉक्टर, नातेवाईक यांच्या विकृतीच्या त्या शिकार होत आहेत. कारण कायद्याचा धाक राहिलेला नाही. ज्या महाराष्ट्रात जोतिबा, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे जन्मास आले, त्याच महाराष्ट्रात अशा घटना घडताना पाहणे हे चिंताजनक आहे", अशी खंतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.