नितीन पाटणकर, साम टीव्ही
पुणे : विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. मराठा आरक्षणासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारसभेत आश्वासन दिले जात आहे. या आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेतही आरक्षणाच्या मागणीचे पडसाद उमटल्याचे दिसले.
पुण्यातील पंतप्रधान यांच्या सभेत लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या पंतप्रधान मोदी यांच्या पुण्यातील या प्रचारसभेत एका व्यक्तीने आरक्षणाची मागणी केली. मोदींच्या भाषणादरम्यान एकाने घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीची घोषणाबाजी थांबवली.
आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्यानंतर अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. या व्यक्तीने घोषणाबाजी केल्यानंतर इतर भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांसहित पोलिसांकडून तातडीने त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा व्यक्ती शांत झाला. या व्यक्तीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. या व्यक्तीने घोषणाबाजी केल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती हाती आलेली नाही.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी दिसून आली. त्यांची अवघ्या २ ते ५ सेकंदाची झलक पाहण्यासाठी पुण्यातील अनेक चौकात लोकांची गर्दी दिसली. बालगंधर्व, डेक्कन, अलका टॉकीज या चौकात नागरिकांनी मोदींची झलक पाहताच जल्लोष केला.
पुण्यातील सभेत संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पंतप्रधान मोदींना भेट देण्यात आली. सभा आटोपून पंतप्रधान मोदी पुणे विमानतळाकडे निघाले. यावेळीही नागरिकांनी मोदींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.