नीलेश बोरूडे
Pune News किरकटवाडी: उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडे येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसूती केली. त्यानंतर नवजात बाळाला फेकून दिल्याचे समोर आले आहे. तशी कबुली संबंधिताने दिली. या घटनेची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Pune News)
चार ते पाच महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी व तिची आई घराजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात (Hospital) गेली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मुलगी गरोदर असण्याची शक्यता असून आपण तातडीने याबाबत सोनोग्राफी करून खातरजमा करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला होता. (Letest Marathi News)
त्यावेळी आई व मुलीने डॉक्टरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले व गर्भपिशविला सूज आल्याने मुलीच्या पोटात दुखत आहे, असे शेजाऱ्यांना व घराच्या मालकिणीला सांगितले. त्यावेळीच मुलगी गरोदर असावी आणि तिची आई आपल्यापासून काहीतरी लपवत असावी असा संशय आला होता, असे घर मालकिणीने सांगितले.
नवजात बाळ सोसायटीच्या आवारात आढळून आल्याने सर्वांना धक्का बसला. पोलीस आले व बाळाला उपचारांसाठी घेऊन गेले. त्यानंतर चर्चा सुरू असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक रुग्णवाहिका सोसायटीच्या खाली दिसली होती आणि सोसायटीतल्या एका मुलीला बेशुद्धावस्थेत त्यातून नेण्यात आल्याचे काहींनी सांगितले.
मागील चार महिन्यांपूर्वीचा घटनाक्रम लक्षात आला व ते नवजात बाळ याच मुलीचे असावे अशी त्यांची खात्री पटली. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांना ही माहिती कळवली.
दोषींवर कठोर कारवाई होणार
एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या संबंधित अल्पवयीन मुलीने ते बाळ आपणच तेथे फेकले असून, युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले आहे.
राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल
"ही अत्यंत धक्कादायक घटना असून राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वाधिकाराने दखल घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. सध्या बाळ व कुमारी माता उपचार घेत असून, राज्य महिला आयोग यावर जातीने लक्ष देत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.