सागर आव्हाड| पुणे, ता. २३ जुलै २०२४
पुणे शहरातील ससून रुग्णालय गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ललित पाटील प्रकरण, त्यानंतर पोर्शे अपघातावेळी ससूनमधील गैरप्रकार समोर आले होते. त्यानंतर आता ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले असून बेवारस रुग्णांना उपचाराऐवजी निर्जनस्थळी सोडून दिले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील डॉक्टर हे बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात, रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. त्यांनी एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर तो रुग्ण त्याठिकाणी नसल्याचे समोर आले. याबाबत चौकशी केली असता, त्याला डॉक्टर घेऊन गेले, मात्र परत आणले नाही अशी माहिती मिळाली.
त्यामुळे काहीतरी गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभा होता. यावेळी ससून रुग्णालयातील डॉ आदी यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का? अशी चौकशी केली. 'इथून लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायचे, असेही सांगितले.
काही वेळाने दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.
रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.