Ketan Agarwal Lohgad Murder Case : पुण्यातील लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडात दररोज थरारक खुलासे होत आहेत. पुणे पोलिसांच्या हाती अत्यंत खळबळजनक माहिती लागली आहे. मुख्य आरोपी सिया हिने केतनचा काटा काढण्यापूर्वी गुगलवर (Google) नेमकं काय शोधलं होतं, याचा संपूर्ण माहिती पोलिसांच्या समोर आली आहे. सियाच्या मोबाईल सर्च हिस्ट्रीने (Mobile Search History) पोलिसांचीही झोप उडवली आहे.
पोलिसांनी जेव्हा सियाचा मोबाईल तपासला, तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्या. केतनची हत्या करण्यापूर्वी सियाने गुगलवर 'राजा रघुवंशी केस'ची (Siya Goyal Search Raja Raghuvasnshi Case) संपूर्ण माहिती वाचली होती. इतकंच नाही, तर "पोलिस कस्टडीत महिला आरोपींना मारहाण होते का?" याबाबतही तिने गुगलवर सर्च केल्याचं उघड झालं आहे. सिया गोयलने अत्यंत थंड डोक्याने आणि विचारपूर्वक केतन अग्रवाल हत्याकांडाचा कट रचल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलने केतनची हत्या करण्याआधी इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सियाने पोलीस कोठडीत महिलांवर हल्ला होतो का, याबद्दलही इंटरनेटवर शोध घेतला होता. ही माहिती सियाच्या दोन्ही मोबाईल फोनच्या सर्च हिस्ट्रीमधून मिळाली.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी सियाच्या बेडरूममधून दुसरा मोबाईल फोन जप्त केला. त्यांनी घटनेच्या दिवशीच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचाही शोध घेतला. त्यांच्या जबाबांमुळे तपासाला अधिक बळकटी मिळत आहे. सिया आणि चेतनने १८ जून रोजी केतनला पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलले. दोघेही सध्या १६ जुलैपर्यंत येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
राजा रघुवंशी हत्या प्रकरण काय आहे?
इंदोरचा व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह ११ मे २०२५ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवसांनी ते हनिमूनसाठी मेघालयाला गेले. २३ मे २०२५ रोजी होमस्टेमधून निघाल्यानंतर राजा रघुवंशी बेपत्ता झाले. राजाचा मृतदेह २ जून २०२५ रोजी सोहरा येथील वेई सॉडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत सापडला. राजाची पत्नी सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि इतरांसोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. सध्या सोनम रघुवंशीला मेघालय उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.