Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचे सामने, दिवाळी पार्टीत झालेली ओळख, प्रेम आणि त्यानंतर रचला गेलेला हत्येचा एक भयानक कट... पुणे जिल्ह्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. केतनची पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केवळ केतनचा काटा काढला नाही, तर या हत्येचा चक्क 'क्राईम डेमो' (सराव) देखील केला होता, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
गुगलवर शोधले हत्येचे पर्याय; लोहगडवर केला सराव
पोलिसांनी केलेल्या तपासणीत सिया आणि चेतनच्या मोबाईलमधील धक्कादायक गुपिते समोर आली आहेत. केतनला संपवण्यासाठी दोघांनी गुगलचा (Google) आधार घेतला होता.
'केतनला विष देऊन ठार मारता येईल का?'
'लोहगडच्या कोणत्या कड्यावरून ढकलल्यास हत्या नसून अपघात वाटेल?'
'खून केल्यानंतर पोलिसांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा?'
अशा अनेक गोष्टी त्यांनी गुगलवर सर्च केल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, घटनेच्या काही दिवसांपूर्वी या दोघांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन केतनला धक्का कसा द्यायचा, याचा सराव (Rehearsal) केला होता. अखेर १८ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून केतनची निर्घृण हत्या करण्यात आली.
'त्या' लाल इलेक्ट्रिक कारची चौकशी सुरू
घटनेच्या दिवशी वापरण्यात आलेल्या लाल रंगाच्या इलेक्ट्रिक कारची तपासणी पोलिसांनी आता सुरू केली आहे. केतनने ही कार नुकतीच खरेदी केली होती. कार घेतल्यानंतर केतन आणि सियाचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच कारमधून १८ जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर गेले होते. या कारच्या फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणीतून पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
क्रिकेट लीग ते राजस्थान दौरा; कसं फुललं प्रेम?
केतनच्या हत्येमागे चेतन आणि सियाच्या गुप्त प्रेमाची पार्श्वभूमी आहे. चेतन चौधरी हा स्थानिक क्रिकेट लीगमध्ये खेळायचा. चेतनचे सामने पाहण्यासाठी सिया अनेकदा मैदानावर हजेरी लावायची. दोघांचे एकत्र मॅच पाहतानाचे व्हिडिओही पोलिसांच्या हाती लागले आहेत. एका दिवाळी पार्टीत ओळख झाल्यानंतर आधी मैत्री आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्न ठरण्यापूर्वीच सिया आणि चेतनने आपल्या मित्रांसोबत राजस्थानचा दौराही केला होता.
कुटुंबाचा विरोध अन् घेतलेला भयंकर निर्णय
सिया आणि चेतनच्या नात्याचा संशय सियाच्या 'गोयल' कुटुंबाला आला होता. त्यामुळेच कुटुंबाने घाईघाईत सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला थेट विरोध करण्याची हिंमत सियामध्ये नव्हती. त्यामुळे "कुटुंबाशी भांडण्यापेक्षा केतन अग्रवाललाच रस्त्यातून हटवणं सोपं राहील," असा क्रूर विचार सियाने केला आणि चेतनच्या मदतीने हा कट अंमलात आणला.
सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी
पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी सियाच्या आई-वडिलांचीही सखोल चौकशी केली. "सिया आणि चेतनच्या संबंधांची तुम्हाला आधीपासून कल्पना होती का?", "तिने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का?" या आणि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांवर केली आहे.
पोलिसांना आधीपासूनच संशय होता की या घटनेला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौकशीदरम्यान काय उत्तरं द्यायची, पोलिसांची दिशाभूल कशी करायची, याचेही ट्रेनिंग चेतनने सियाला दिले होते. मात्र, पोलिसांनी गुगल सर्च हिस्टरी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या 'परफेक्ट मर्डर'चा थरारक पर्दाफाश केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.