

निवडणुकांची रणधुमाळी सुरू
राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांकडून प्रचारासाठी अजितदादांच्या नावाचा वापर
नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त
सागर आव्हाड, साम टीव्ही
पुण्यातील इंदापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही उमेदवारांकडून घड्याळाला मत हिच अजितदादांना खरी श्रद्धांजली” अशा स्वरूपाचा प्रचार सुरू करण्यात आलाय. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय असलेल्या इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी- काटी गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले यांच्या व्हाट्सअॅप स्टेटस ठेवल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या संवेदनशील क्षणांचा वापर करून मतांची मागणी करणे हे अत्यंत अयोग्य आणि असंवेदनशील असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटताना पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पोस्ट आणि स्टेटसवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'दुःखाच्या काळात प्रचार नव्हे, तर संयम हवा, अशी भूमिका अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि जाणकार नागरिक घेताना दिसत आहेत. खरी श्रद्धांजली ही मतांच्या घोषणामध्ये नाहीये. तर अजितदादांनी सुरू केलेल्या विकासकामांना पुढे नेण्यात आणि त्यांच्या विचारांनुसार काम करण्यात असल्याची भावना व्यक्त केली जातेय.
एकीकडे अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या नावाचा प्रचारासाठी वापर होणे ही बाब अनेकांच्या मनाला लागणारी ठरत आहे. राजकीय लाभापेक्षा सार्वजनिक संवेदनशीलतेला प्राधान्य देणे हीच खरी आदरांजली ठरेल, अशा भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अशा उमेदवारांना समज देणार का?
'घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना श्रद्धांजली असा प्रचार आणि व्हॉट्सॲप स्टेटस सुरू असल्याचे समोर आलंय. या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लागलंय. दुःखाच्या काळात जनभावनांशी खेळ करणाऱ्या उमेदवारांना वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट समज द्यावी. अजितदादांच्या नावाचा प्रचारासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. परंतु कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत अद्याप अधिकृत भाष्य केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.