Illegal gender detection: पुण्यात गर्भलिंगनिदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश, दोन डॉक्टर फरार; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुला

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेट उघडकीस आलं आहे. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हे दाखल असून काही डॉक्टर फरार आहेत. पोलिसांकडून आणि आरोग्य विभागाकडून तपास व कठोर कारवाई सुरू आहे.
Illegal gender detection
Illegal gender detectionsaam tv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एक मोठं आणि धक्कादायक बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील अवैध वैद्यकीय धंद्यांचं मोठं जाळं समोर येण्याची शक्यता निर्माण झालीये. या कारवाईत आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात भोर तालुक्यातील किकवीमध्ये डॉ. मंदार माळी आणि उरुळी कांचनमधील येथील सुंदरम कदम यांचं नाव समोर आलं आहे. हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या मते, हे दोघं या संपूर्ण रॅकेटमध्ये एक्टिव्ह होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, चौकशीदरम्यानच फरार असलेल्या दोन्ही डॉक्टरांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आलीये. गर्भलिंगनिदानासाठी वापरलं जाणारं बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आरोपी अण्णासाहेब गिरी याला नरेंद्र ठाकरे याने पुरवलं असल्याची माहिती मिळालीये. सध्या नरेंद्र ठाकरे न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व घडामोडींमुळे या रॅकेटमध्ये अजून किती लोक सहभागी आहेत, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाने केवळ पोलीसच नाही तर जिल्हा आरोग्य विभागालाही सतर्क केलं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अण्णासाहेब गिरीचे एजंट कार्यरत असल्याची माहिती समोर आलीये. या एजंटांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे गर्भलिंगनिदान केलं गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयं आणि वैद्यकीय केंद्रांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिलीये. अशा बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com