राज्यात पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. पुण्याच्या घोडेगाव येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात. गंभीर बाब म्हणजे यापूर्वी राज्यात काही ठिकाणी पोषण आहारात साप, झुरळ, बेडूक आढळलं आहे. पाहूया यावरचा सामचा एक विशेष रिपोर्ट.
शाळेत किंवा आश्रमशाळेत दिला जाणारा मध्यान्ह आहार किंवा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं वारंवार समोर येतंय. पुण्याच्या घोडेगाव येथील निवासी आदिवासी आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांना नाश्यातमध्ये दिल्या जाणाऱ्या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्यात. गंभीर बाब म्हणजे गेल्या दीड महिन्यांपूर्वी इथल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या. मात्र त्यातूनही प्रशासनानं धडा घेतला नाही. आता पुन्हा तसाच प्रकार घडल्यानं शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची कशी क्रूर थट्टा करतंय हे स्पष्ट होतंय.
आश्रमशाळेतील या धक्कादायक घटनेनंतर यंत्रणा हादरली आहे. प्रकल्प अधिका-यांनीही अळ्या सापडल्याचं मान्य केलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे नमुने पाठवले जाणार आहेत. ही एकमेव घटना नाही. गेल्या महिन्याभरात राज्यातील विविध शाळांमध्ये, आश्रमशाळांमध्ये निकृष्ट पोषण आहाराचे प्रकार समोर आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत बालकांच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या होत्या.
सोलापूर जिल्ह्यात कासेगाव येथील भुसेनगरच्या अंगणवाडी मध्ये आणि धाराशिवच्या पाडोळी गावात पोषण आहारात चक्क मेलेला बेडूक आढळून आलाय. याशिवाय सांगलीमध्ये साप, नांदेडमध्ये अळ्या तर घाटकोपरमध्ये पोषण आहारात झुरळ आढळलं होतं. असे प्रकार घडल्यावरही केवळ कोरडी चौकशी करून थातूर मातूर कारवाई केली जाते. त्यामुळे मुलांचे बळी गेल्यानंतरच सुस्त यंत्रणेला जाग येणार का? असा संतप्त सवाल केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.