

शिवसेना नेते अजय भोसले गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट
छोटा राजनसह पाच जणांची निर्दोष मुक्तता
१७ वर्षांनंतर पुण्यातील गोळीबार प्रकरणाचा न्यायालयीन निकाल
शिवसेना नेते अजय भोसलेंवरील गोळीबार प्रकरणातून गँगस्टर छोटा राजनसह ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १७ वर्षांनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्र कायद्यांतर्गत असलेल्या गुन्ह्यांमधून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निर्दोष मुक्त झालेल्यांमध्ये पुणेकर बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अग्रवाल, मोहम्मद खान, विजय तांबट आणि राजेश यादव यांचा समावेश आहे.
पुण्यात २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते अजय भोसले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.११ ऑक्टोबर २००९ रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात निवडणुकीचा प्रचार करत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अजय भोसले यांच्या कारवर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये ते थोडक्यात बचावले होते. पण त्यांचा चालक जखमी झाला होता.
या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजनसह ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश नरेंद्रनाथ प्रधान यांनी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन, व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल, शाकिब आलम खान, राजेश यादव आणि विजय पुरुषोत्तम साळवी यांची खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाचा सुरुवातीला बंडगार्डन पोलिसांनी तपास केला होता. मात्र, २०१५ मध्ये छोटा राजनला भारतात आणल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
२०१५ मध्ये छोटा राजनच्या प्रत्यार्पणानंतर सीबीआयने त्याच्यावर नोंदवलेल्या इतर ७० प्रकरणांसह या प्रकरणाचा तपास हाती घेतला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, अभियोजन पक्षाने छोटा राजनला एका संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख म्हणून संबोधले आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच अनेक गुन्ह्यांमधील त्याचा कथित सहभाग नमूद केला. छोटा राजनच्या बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, या कटात किंवा भोसले यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नात त्याच्या सहभागाचा कोणताही ठोस पुरावा नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.